Ashadhi Ekadashi 2022 : यंदाच्या आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेत सहभागी होण्याचा मान गेवराई (ता. बीड) च्या नवले दाम्पत्याला मिळाला. मुरली भगवान नवले (52) आणि जिजाबाई मुरली नवले (47) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शासकीय महापूजा केली. नवले दाम्पत्य गेली 20 वर्षे वारी करत आहेत. शेतकरी असलेलं नवले दाम्पत्य यावर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत पायी आले आहेत. दरम्यान, यंदा विठ्ठलाची शासकीय महापूजा नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडली. यावेळी एकनाथ शिंदेंसोबत त्यांच्या पत्नी, लता एकनाथ शिंदेही उपस्थित होत्या. तसेच, त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदेही सपत्नीक उपस्थित होते. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रुई गावच्या मुरली बबन नवले आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई मुरली नवले या शेतकरी दाम्पत्याला विठुरायाच्या शासकीय महापूजेचा मान मिळाला आहे. गेली 20 वर्ष शेती करून आपल्या कुटुंबाला सांभाळणाऱ्या नवले कुटुंबात 1987पासून वारीची परंपरा सुरु आहे. मुरली नवले हे दरवर्षी न चुकता सलग वारी करत आहेत. तसेच, ते श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातही गेल्या 12 वर्षांपासून पायी वारी करत आहेत.

कोरोनामुळे मागील दोन वर्ष पंढरपुरातील आषाढी वारी निर्बंधात पार पडली होती. यंदा मात्र आषाढी वारी निर्बंधमुक्त पार पडत आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. यंदाच्या वारीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकऱ्यांनी उपस्थिती लावली आहे. यंदा आषाढी वारीसाठी 12 लाखांहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. विठ्ठल-रूक्मिणी मंदिर परिसरासोबतच चंद्रभागा नदीत स्नान करण्यासाठी लाखो वारकऱ्यांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतेय.

  

मुख्यमंत्री शिंदे यांच्या 4 पिढ्या विठुरायाच्या पुजेसाठी उपस्थित

विठुरायाच्या शासकीय महापूजेसाठी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या संपूर्ण कुटुंबासह उपस्थित होते. यावेळी त्यांचे वडील संभाजी, एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता, मुलगा श्रीकांत आणि नातू देखील पूजेसाठी उपस्थित होते. पंढरपुरात नगरपालिका आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाचे नियम पाळून महापूजा करावी लागली आहे. यावेळी मुख्यमंत्री कोणतेही राजकीय कार्यक्रम घेऊ शकणार नाहीत. निवडणूक आयोगाच्या काही अटी-शर्थींवरचा पूजेची परवानगी देण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here