मुंबई : मुंबईत मागील पाच वर्षांत ६०८ किमी लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. तर आतापर्यंत मुंबईत एकूण सुमारे ८०० किमी लांबीचे रस्ते काँक्रीटचे झाले आहेत. अशा रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या निकाली निघाली आहे. मात्र पावसाळ्यात जमिनीत पाणी मुरण्यास जागा शिल्लक राहत नसल्याने पाणी तुंबण्याचे प्रमाण वाढते आहे.
मुंबईत सुमारे दोन हजार ५५ किमी लांबीचे रस्ते आहेत. पैकी १,२५५ किमी डांबरी; तर ८०० किमी काँक्रीट रस्ते आहेत. मुंबईतील खड्ड्यांची समस्या निकाली काढण्यासाठी शहर आणि उपनगरातील रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे प्रतिवर्षी खड्ड्यांची संख्या आणि समस्या हळूहळू कमी होत आहे, असा दावा पालिकेने केला आहे. यापुढे सहा मीटर रुंदीचे रस्तेसुद्धा टप्प्याटप्प्याने सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचे धोरण पालिकेने स्वीकारले आहे. त्यामुळे भविष्यात अधिकाधिक रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण होऊन खड्ड्यांची समस्या निश्चितच कमी होणार आहे, अशी माहिती अतिरिक्त पालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची महापूजा; विठ्ठलनामाच्या गजराने अवघे पंढरपूर दुमदुमले
मुंबईत एकीकडे काँक्रीटीकरण वाढत असताना, पावसाळ्यात पाणी तुंबण्याची समस्या निर्माण होते आहे. डांबरी रस्ते ही जमिनीत पाणी मुरण्यास उपयुक्त ठरतात, मात्र या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडत असल्याने पालिकेने काँक्रीटीकरणाचा पर्याय काढला आहे. काँक्रीटीकरणाने रस्ते बळकट होत असून, खड्डे पडण्याचे प्रमाण कमी झाले असले, तरी जमिनीत पाणी मुरण्यास जागा शिल्लक राहत नाही. त्यामुळे पाणी साचण्याचा नवी ठिकाणे निर्माण होत आहेत. पाणी उपसा करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून ठिकठिकाणी भूमिगत टाक्या बांधल्या जात आहेत.
यावर पर्याय म्हणून रस्त्यांच्या कडेला डांबरी किंवा मातीचा पट्टा ठेवल्यास त्यातून जमिनीत पाणी मुरण्यास वाव मिळेल अशी मागणी नागरिकांकडून केली जाते आहे.
इतर सरकारी यंत्रणाकडे करा तक्रार
मुंबईत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, रेल्वे, खासगी लेआउट याप्रमाणेच इतरही शासकीय प्राधिकरणांच्या अखत्यारित काही रस्ते आहेत. या रस्त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी संबंधित प्राधिकरणांची असते. त्यामुळे पालिका प्रशासनाच्या वतीने या प्राधिकरणांच्या रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी संबंधित प्राधिकरणाकडे तक्रार नोंदवण्याचे आवाहन पालिकेने आहे.