Maharashtra Rain :  राज्याच्या विविध भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेतकरी आनंदी असल्याचे दिसत आहे. राज्यातील मुंबईसह, ठणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापुरात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यातही चांगला पाऊस सुरु असल्याचं दिसत आहे. मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड या जिल्ह्यात काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळं नदी नाले धुथडी भरुन वाहत असल्याचं चित्र दिसत आहे. तसेच कोकणात देखील चांगला पाऊस पडत आहे.

राज्यात काही ठिकाणी सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. नदी नाल्यांना काही ठिकाणी पूर आले आहेत. तर मराठवाड्यात या पावसामुळं शेतीचं देखील मोठं नुकसान झालं आहे. हजारो हेक्टरवरील पीकं पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. 

बुलढाणा पाऊस

बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात रात्री देखील जोरदार पाऊस पडला. मध्यरात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडल्याने अनेक नदी , नाल्यासह ओढ्यांना पूर आला आहे. अनेक दिवसांपासून शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत होते. अखेर चांगला पाऊस झाल्यानं शेतकरी आनंदी आहेत.

वर्धा पाऊस

वर्धा जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला आहे. मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पूर परिस्थिती झाली आहे. शहरालगत असलेल्या सालोड हिरापूर आणि धोत्रा या दोन गावाला जोडणाऱ्या नाल्याला नदीचे स्वरुप आले आहे. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळं शेतात गेलेल्या तेरा महिला व एक पुरुष पाण्यात अडकले होते. त्यांचा जीव धोक्यात अडकला होता मात्र, रात्रीच्या या नागरिकांना बाहेर काढण्यात यश आलं आहे.

चंद्रपूर पाऊस

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील धक्कादायक घटना घडली. प्रवाशांनी भरलेली टाटा मॅजिक गाडी पुराच्या पाण्यात वाहून गेली. टाकळी-पानवडाळा दरम्यानच्या नाल्याला आलेल्या पुरात चालकाने हलगर्जीपणाने गाडी घातली होती. या गाडीत 5 प्रवाशी होते. गाडी पुराच्या पाण्यात वाहून जात असल्याचे लक्षात येताच प्रवाशांनी टपावर आश्रय घेतला. गावातील नागरिकांसह सैन्यात असलेल्या निखिल काळे या जवानाने घटनास्थळी धाव घेत भर पावसात बचावकार्य राबवले. स्थानिकांनी दाखवलेल्या धाडसाने सर्वच प्रवाशांची सुटका केली आहे. 

हिंगोली

हिंगोली जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. पहाटेच्या सुमारास उघडीप दिलेला पाऊस पुन्हा सुरु झाल्यामुळं शेतकऱ्यांसह नागरिकांची चिंता वाढली आहे. असाच आणखी काही दिवस पाऊस सुरु राहिला तर खरिपातील कोवळ्या पिकांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here