Mumbai Local : हजारो रेल्वे प्रवाशांना वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांत अडकून पडण्याची वेळ आली होती. त्यामुळे काही प्रवाशांनी रस्ते वाहतुकीचा मार्ग अवलंबला.

हायलाइट्स:
- ओव्हर हेड वायरमधील तांत्रिक बिघाडाचा फटका
- ठाणे-पनवेल, वाशी गाड्या अडीच तास बंद
- प्रवाशांना कुर्ल्याचा द्रविडी प्रणायाम
नवी मुंबई आणि पनवेल परिसरात जाणाऱ्या नोकदारांना ठाणे-पनवेल, ठाणे-वाशी ही ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकलसेवा उपयुक्त ठरते. परंतु, शनिवारी दुपारी १२.४० वाजण्याच्या सुमारास ओव्हर हेड वायरमधील बिघाडामुळे ही वाहतूक पूर्ण ठप्प झाली. ठाणे स्थानकातून सुटणाऱ्या गाड्या ठाण्यात खोळंबून पडल्या. तर पनवेल आणि वाशीकडून येणाऱ्या गाड्याही तुर्भे, नेरुळ स्थानकात अडकून पडल्या. यामुळे या मार्गावरील संपूर्ण प्रवास बंद झाल्याने प्रवासी रेल्वे गाड्यांमध्ये अडकून पडले होते. तांत्रिक बिघाडामुळे गाड्या बंद झाल्यामुळे अनेक प्रवाशांनी रेल्वेतून उतरून रस्तेमार्गे प्रवासाला प्राधान्य दिले. परंतु, अनेकांना इच्छित स्थळी जाण्यासाठी रस्ते वाहतुकीचा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी स्टेशन परिसरात थांबून लोकल सुरू होण्याची वाट पाहिली. त्यामुळे काही स्थानकांत गर्दी होती, तर काही स्थानकात गाड्या बंद असल्याने चिटपाखरूही नसल्याचे चित्र होते.
ठाण्यातील प्रवाशांना कुर्लामार्गे प्रवास करण्याची मुभा रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली होती. परंतु, ठाण्याहून कुर्ला आणि कुर्ल्याहून पनवेल, असा द्रविडी प्रणायाम करावा लागल्याने प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. कुटुंबासह सुट्टीसाठी बाहेर गेलेल्यांनाही याचा फटका सहन करावा लागला. दुपारी ३.१० वाजता वाहतूक सुरळीत झाल्याचे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : local service on thane-panvel trans harbor route near koparkhairane station was disrupted due to technical fault in overhead wire
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network