मुंबई : कोणतीही पूर्वकल्पना न देता वैद्यकीय महाविद्यालयांसह सार्वजनिक रुग्णालयांमधील ‘एचएमआयएस’ प्रणाली बंद करण्यात आल्याने राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत. यापूर्वी करण्यात आलेल्या चाचण्यांचा डाटा उपलब्ध नसल्यामुळे नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत, तर काही चाचण्यांचे अहवाल कुठे जतन करायचे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. या निर्णयामुळे सार्वजनिक रुग्णालयांत येणाऱ्या रुग्णांना त्रास होत असून, या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालावे, अशी विनंती सर्वसामान्य रुग्णांसह लोकप्रतिनिधींही केली आहे.

सांगली विधानसभा मतदारसंघातील आमदार सुधीर गाडगीळ यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, तसेच सांगली येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात ही प्रणाली बंद झाल्यामुळे विस्कळीत झालेल्या रुग्णसेवेला दुरुस्त करण्याची गरज व्यक्त केली आहे. ६ जुलैपासून ही सेवा बंद झाल्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळामुळे या यंत्रणेवर ताण येत आहे. रुग्णशुल्काचा ताळेबंद ठेवणे अडचणीचे होत आहे. ही प्रणाली त्वरित पूर्ववत करून रुग्णांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. बीड येथील विधानसभा सदस्य नमिता मुंदडा यांनीही अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये येणाऱ्या गरीब रुग्णांना तिष्ठत राहावे लागत असल्याची बाब पत्राद्वारे मुख्यमंत्र्याच्या निदर्शनास आणून दिली आहे. मुंबईतील सार्वजनिक रुग्णालयांमध्ये ही यंत्रणा बंद झाल्याने लेखी नोंदी त्वरित होत असल्याचे दिसत असले, तरीही रुग्णांची माहिती जतन करण्यात मोठे आव्हान असल्याचे रुग्णालय प्रशासनांनी ‘मटा’ला सांगितले.

वरुणराजाची अखंड बरसात आणि लाखो वारकऱ्यांच्या महासागराने विठुरायाची पंढरी फुलली

सरकार चर्चा का करत नाही

ही सुविधा पुरवणाऱ्या कंपनीची शंभर कोटींची देणी थकली आहेत. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाकडे यासंदर्भात पाठपुरावा करूनही प्रतिसाद मिळत नाही. पैसे एकाच वेळी देणे शक्य नसेल, तर त्याची पूर्तता टप्प्याटप्यांत कशी करता येईल याचे नियोजन सादर केल्यास चर्चेतून मार्ग निघू शकेल, असा विश्वास संबधित कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. मात्र, सरकार याविषयावर चर्चा करण्यास का तयार नाही याचे आश्चर्य त्यांनी व्यक्त केले.

विठुरायाच्या दर्शनाला येताना भाविकांवर काळाचा घाला, कासेगाव फाट्यावर अपघात, दोघांचा मृत्यू

आयुक्त गैरहजर

राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांना ही प्रणाली बंद केल्यामुळे रुग्णसेवेवर कोणता परिणाम होतो, याची माहिती संध्याकाळी बैठकीमध्ये देण्याचे निर्देश देण्यात आले. रुग्णसेवेवर परिणाम होत असला, तरीही सर्व ठीकठाक असल्याचे सांगत असल्याची कबुली ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या रुग्णालय प्रशासनांनी दिली. ही प्रणाली बंद करून नव्या प्रणालीचे काम सुरू करायचे असेल, तर ते आठ दिवसांत व्हायला हवे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. शनिवारी संध्याकाळी झालेल्या आढावा बैठकीमध्ये आयुक्त वीरेंद्र सिंग अनुपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here