पुणे : ओडिशावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे शनिवारी पुण्यासह राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज वर्तवला असून, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचीही शक्यता वर्तवली आहे.

कमी दाबाचे क्षेत्र

बंगालच्या उपसागरात हंगामातील दुसरे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे मोसमी वाऱ्यांचा जोर कायम आहे. दुसरीकडे पश्चिम किनारपट्टीवर दक्षिण गुजरातपासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. मध्य भारतावरून जाणारा पश्चिम- पूर्व कमी दाबाचा पट्टा (मान्सून ट्रफ) त्याच्या सर्वसाधारण स्थानापेक्षा दक्षिणेला आहे. या स्थितीच्या प्रभावामुळे राज्यात पुढील पाच दिवस सक्रिय मान्सूनची स्थिती राहील, असे ‘आयएमडी’ने हवामान अंदाजात म्हटले आहे.

पुण्यात संततधार

पुण्यात शनिवारी दिवसभर पावसाची संततधार अनुभवायला मिळाली. शनिवारी सकाळी साडेआठ वाजता शिवाजीनगर येथे ११.२, तर पाषाण येथे ५१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यापुढेही पावसाची रिपरिप सुरू होती. संध्याकाळी साडेपाचपर्यंत शिवाजीनगर येथे १८.२, पाषाणला १८.१, तर चिंचवडला २३ मिमी पावसाची नोंद झाली.

प्रसाद लाड यांच्या घराबाहेर सापडली सोने-चांदी, देवाच्या मूर्ती आणि पैशांनी भरलेली बॅग

घाट क्षेत्रात पावसाचा जोर अधिक होता. लोणावळा येथे शुक्रवारी सकाळी साडेआठ ते शनिवारी रात्री साडेआठ या वेळेत १६३ मिमी पावसाची नोंद झाली. ‘आयएमडी’च्या लवासा येथील केंद्रावर ३६ तासांमध्ये ३२५.५मिमी पाऊस नोंदला गेला. महाबळेश्वरला शनिवारी दिवसभरात १०० मिमी पाऊस नोंदला गेला. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या चारही विभागांमध्ये पावसाने हजेरी लावल्याचे ‘आयएमडी’च्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले. शनिवारी दिवसभरात राज्यातील विविध शहरांमध्ये नोंदला गेलेला पाऊस मिमीमध्ये : पुणे १३.३, नगर ४, कोल्हापूर २०, महाबळेश्वर १००, सातारा २१, सोलापूर २२, रत्नागिरी ३, परभणी ३, बुलढाणा १६, चंद्रपूर ४५, नागपूर १४, वर्धा १००.

वरुणराजाची अखंड बरसात आणि लाखो वारकऱ्यांच्या महासागराने विठुरायाची पंढरी फुलली

दोन दिवस ‘रेड अलर्ट’

कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे येत्या १३ जुलैपर्यंत राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, दहा जुलैला रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा; तसेच ११ जुलैला या जिल्ह्यांसह पालघरसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता गृहीत धरून ‘आयएमडी’तर्फे या दोन विभागांना पुढील पाच दिवसांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. मोठ्या पावसाचा परिणाम म्हणून महाराष्ट्र आणि गोव्यातील घाट रस्त्यांवर दरडी कोसळू शकतात, असा इशारा ‘सेंटर फॉर सिटिझन सायन्स’च्या ‘सतर्क’ या उपक्रमांतर्गत देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here