दरम्यान, सायंकाळी उशीरापर्यंत प्रशासनाने सुमारे १५ हजार हेक्टरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. यामध्ये नदी, नाल्याकाठी जमीन खरडून गेली तर नुकतेच पेरणी केलेले बियाणे वाहून गेले. याशिवाय सुमारे १०० पेक्षा अधिक जनावरे वाहून गेल्याचा अंदाजही प्रशासनाने व्यक्त केला आहे. त्यानंतर आज सर्वेक्षणाचे काम हाती घेतले जाणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. खल्लाळ यांनी दिली आहे.
आज या भागातील गावांमध्ये साथरोग पसरू नये यासाठी आरोग्य विभागाने तातडीच्या उपाय योजना हाती घेतल्या आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप काळे, विस्तार व माध्यम अधिकारी प्रशांत तुपकरी यांनी गावात भेटी दिल्या. गावातील सर्व पाणीस्त्रोताचे निर्जंतुकीकरण करण्याच्या सुचना दिल्या असून त्यानुसार कामाला सुरवात झाली आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात वाढीव औषधीसाठा उपलब्ध करून ठेवण्यात आला आहे.