कुडाळ तालुक्यातील घोडगे सोनवडे गावातील एका १४ वर्षीय मुलीची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ही मुलगी मुंबईतून गावी आली आहे. या मुलीच्या आजोबांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्यामुळे मुंबईतून ही मुलगी व कुटुंबीय रितसर परवानगी घेऊन जिल्ह्यात आले. हे सर्व जण गावी पोहचायच्या आधीच आजोबांवर अंत्यसंस्कार झाले होते. दरम्यान, ग्रामस्थांनी या कुटुंबीयांना करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गावात यायला मनाई केली. त्यामुळे ते गावात जाऊच शकले नाहीत.
मुंबईतून आलेल्या या पाचही जणांना गेले आठ दिवस आरोग्य विभागाने क्वारंटाइन केले आहे. यातील बाकी सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले मात्र मुलीचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिचा कुणाकुणाशी संपर्क आला याचा शोध आता यंत्रणा घेत आहे आणि त्यानुसार दक्षतेचे उपाय योजत आहे.
३३ दिवसांनंतर करोनाचा दुसरा रुग्ण
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या ३३ दिवसांत करोनाचा एकही रुग्ण आढळला नव्हता. त्यामुळे हा जिल्हा ग्रीन झोनच्या वाटेवर होता. अवघ्या तीनच दिवसांत जिल्हा ग्रीन झोन म्हणून जाहीर होण्याची शक्यता होती. त्यामुळे जिल्ह्यावासीय आनंदात होते. मात्र, जिल्ह्यात करोनाचा रुग्ण आढळल्याने या आनंदावर विरजण पडले आहे.
Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines