Ashadhi Wari 2022 : महाराष्ट्रातील, तसेच आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील कोट्यावधी भाविकांचे आराध्य दैवत म्हणजे पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर. दरव्षी आषाढी आणि कार्तिकी वारीला याठिकाणी वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो. सगळे वारकरी भक्तिसागरात तल्लीन होतात. आषाढी वारीला मानाच्या पालख्या या पंढरपुरात येतात. मागील दोन वर्ष कोरोनाचं संकट असल्यामुळं भाविकांना पंढरपुरात येता आलं नव्हते. मात्र, यंदा कोरोनाचा धोका कमी झाल्यानं सर्व मानाच्या पालख्या पंढरपुरात आल्या आहेत. वारकऱ्यांची यावेळी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान, या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराबद्दल अनेक अभ्यासकांनी त्यांची मते मांडली आहेत. पंढरपुरात देव कसा प्रकटला, तसेच विठोबाची मूर्ती नेमकी आहे कशी? याबाबतची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत…

विठ्ठल, पांडुरंग, पंढरीनाथ अशा अन्य नावांनीही हे देवस्थान प्रसिद्ध आहे. या नोंदीत विठोबाचा निर्देश त्याच्या अन्य नावांनीही केला आहे. महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे विठोबाचे प्रमुख मंदिर आहे. वारकरी संप्रदायाच्या अनुयायाचे वारकऱ्यांचे ते प्रमुख तीर्थस्थान आहे. आषाढी आणि कार्तिकी शुद्ध एकादशांना तिथे सर्व वारकरी, तसेच महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटकांतून लाखो  भाविक विठोबाच्या दर्शनासाठी येतात. शुद्ध माघी आणि शुद्ध चैत्री ह्या एकादशांनाही पंढरपूरला आवर्जून येणारे वारकरी आणि अन्य भाविक आहेत. 

पंडरगे हेच पंढरपूरचे मूळ नाव

पंढरपूर येथील विठोबाच्या मंदिरातल्या सोळंखांबी मंडपातील एका तुळईवर कोरलेल्या संस्कृत आणि कन्नड लेखातील संस्कृत आणि कन्नड अशा दोन्ही भागांत पंढरपूरचा निर्देश ‘पंडरगे’ असा केलेला आढळतो. पंडरगे हेच पंढरपूरचे मूळ नाव असून ते कानडी आहेह्या नावावरुनच पांडुरंगक्षेत्र, पांडुरंगपूर, पौंडरीकक्षेत्र, पांडरीपूर, पांडरी व पंढरपूर ही क्षेत्रनामे तयार झाली. विठोबाला पांडुरंगही म्हणतात पण ‘पांडुरंग’ हे नाव पंडरगे या मूळ क्षेत्रनामाचेच संस्कृतीकरण असून, क्षेत्रनाम म्हणूनही ते वापरले जात होते.  ‘पांडुरंग’ ह्या शब्दाचा अर्थ ‘शुभ्र रंग’ असा होत असल्यामुळे तो गौरवर्णीय शिवाचा दर्शक आहे, असे प्रथमदर्शनी वाटले. तरी तसा अर्थ मराठी संतांना अभिप्रेत असल्याचे कुठेच दिसून येत नाही. मराठी संत हे शिव आणि विष्णू ह्यांच्या ऐक्याचेच पुरस्कर्ते होते तथापी त्यांनी पांडुरंगाला विष्णुचा अवतार असलेला गोपाळकृष्ण मानले. त्यांच्या दृष्टीने तो गोपवेष धारण केलेला श्रीहरी आहे. गाईच्या खुरांमुळे उधळलेली धूळ अंगावर पसरल्यामुळे सारी काया धूसर झालेल्या गोपाळकृष्णाला त्यांनी ‘पांडुरंग’ म्हटले आहे.

श्री ज्ञानदेवांपासून निळोबांपर्यंत अनेक मराठी संतांनी विठोबाचे गुणगान केले आहे. त्याचप्रमाणे चौंडरस, कनकदास, पुरंदरदास अशा दक्षिण भारतीय कवींनीही विठोबाला आपले परमप्रिय आराध्य दैवत मानले आहे. केरळीय कृष्णभक्त कवी लीलाशुक (बारावे-तेरावे शतक) ह्याने आपल्या श्रीकृष्णकर्णामृतम् ह्या संस्कृत काव्यात भीमरथीकाठच्या ‘दिगंबर’ आणि ‘तमालनील’ अशा विठाबोचे वर्णन केले आहे. सुप्रसिद्ध माधव पंडित वादिराजतीर्थ ह्यांनीही आपल्या तीर्थप्रबंधनामक काव्यात विठोबांची स्तुती केली आहे.

विठोबा हे नाव कसे प्रचलीत झाले

विठ्ठलापासून विठोबा हे नाव प्रचारात आले. विठ्ठल ह्या नावाची सर्वमान्य अशी व्युत्पत्ती मिळालेली नाही. इतिहासाचार्य राजवाडे ह्यांनी विठ्ठल हा शब्द ‘विष्ठल’ (दूर रानावनात असलेली जागा) ह्या शब्दापासून व्युत्पादावा, असे म्हटले आहे. ह्या व्युत्पत्यनुसार विठ्ठलदेव हा दूर, रानावनात असणारा देव ठरतो. डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर ह्यांच्या मते ‘विष्णु’ ह्या शब्दाचे कानडी अपभ्रष्ट रूप ‘विट्टि’ असे होते आणि ‘विट्टि’ वरुनच ‘विठ्ठल’ हे रुप तयार झाले. विठ्ठलाचे एक अभ्यासक विश्वनाथ खैरे ह्यांनी ‘इटु’ असा शब्द तमिळ भाषेत असून त्याचा अर्थ ‘कमरेवर हात ठेवलेला’ असा असल्याते प्रतिपादन केले आहे. ‘विटेवर जो उभा, तो विठ्ठल’ अशीही एक व्युत्पत्ती दिली जाते.

विठ्ठल महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाच्या सांस्कृतिक एकतेचं प्रतिक
 
विठ्ठल हा कानडा आहे. श्रीज्ञानदेवांनी त्याला ‘कानडा’ आणि ‘कर्नाटकु’ अशी दोन्ही विशेषणे लावलेली आहेत. एकनाथांनी ‘तीर्थ कानडे देव कानडे, क्षेत्र कानडे पंढरीये’ असे म्हटले आहे. तर नामदेवांनी ‘कानडा विठ्ठल तो उभा भीवरेतीरी’ असा त्याचा निर्देश केला आहे. नामदेव तर विठ्ठलाचा भाषिक निर्देशही करतात. कानडा म्हणजे अगम्य अशा अर्थानेही संतांनी श्रीविठ्ठलाचे उल्लेख केलेला आहे. पंढरपूर हे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेवर आहे. त्याचे प्राचीन नाव ‘पंडरगे’ हे तर कानडीच आहे. विठ्ठलाचे बहुतेक सेवेकरीही कर्नाटकातले आहेत.  श्री विठ्ठल हे महाराष्ट्र कर्नाटकाच्या, तसेच आंध्र प्रदेशाच्या सांस्कृतिक एकतेचे आणि प्रेमाचे प्रतीक आहे.

पंढरपुरात देव कसा प्रकटला

पंढरपुरात विठोबा कसा प्रकटला याविषयीची सर्वश्रुत कथा पुंडलीक या मातृ पितृ भक्ताशी संबंधित आहे. पुंडलिकाच्या भेटीसाठी वैकुंठीचा देव विष्णू हा पंढपुरी आला. आईवडिलांची सेवा करतो आहे, ती पूर्ण होईपर्यंत ह्या विटेवर थांबअसे देवाला सांगून पुंडलिकाने एक वीट भिरकावली आणि त्याच विटेवर देव कटी कर ठेवून उभा राहिला, अशी ही कथा आहे. सर्व संतांनी आणि अन्य भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं स्वीकारलेली आहे. भक्तराज, महावैष्णव म्हणून पुंडलीक ओळखला जातो. पंढरपुरात श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वी पुंडलिकाचे दर्शन घेण्याचा संकेत आहे.

आणखी एक कथा सांगितली जाते ती म्हणजे, डिंडिरव वनातल्या डिंडीरव ह्याच नावाच्या एका दैत्याचा वध करण्यासाठी विष्णुने मल्लिकार्जुन शिवाचे रुप घेतले आणि त्याचा वध केला. पंढरपूर येथे भीमातटी दिंडीरवन म्हणून एक ठिकाण आहे. त्याचा ह्या कथेतील डिंडीरव वनाशी संबंध जोडलेला दिसतो. तसेच आणखी एक कथा म्हणजे कृष्णाने द्वारकेत आल्यानंतरही राधेशी असलेली जवळीक सोडली नाही. म्हणून रुक्मिणी रुसून उपर्युक्त दिंडीरवनात येऊन राहिली. तिची समजूत काढण्यासाठी कृष्ण हा आपल्या गाई गोपाळांसोबत आला. गोपवेष धारण करुन रुक्मिणीस भेटावयास गेला. आपला परिवार त्यानं पंढरपुराजवळच असलेल्या गोपाळपुरास ठेवला. पंढरपुराजवळ असलेल्या गोपाळपुराला वारकऱ्यांच्या वारीत फार महत्त्व आहे. गोपाळपूर हे एक वाडीवजा गाव आहे. तिथे गोपाकृष्णाचे मंदिर आहे. त्या मंदिरात भजने गात दिंड्या जातात. गोपाळकृष्णाचा काला दिला जातो. त्यानंतर वारीची सांगता होते. दिंडीरवनात लखूबाई नावाच्या देवतेचे मंदिर असून तिथे तिचा मूळ अनघड तांदळा आणि त्यामागे तिचे गजलक्ष्मीचे मूर्तीरूप आहे. कृष्णावर रुसून दिंडीरवनात आलेली रूक्मिणी म्हणजेच ही लखूबाई असे समजले जाते. 

विठोबाची स्थापना व पूजन पंढरपूरात कधी सुरु झाले, हे निश्चितपणे सांगता येत नाही. तथापी होयसळ राजा विष्णुवर्धन किंवाबिट्टिदेव किंवा बिट्टिग ह्याने पंढरपूरचे देऊळ बांधले असावे, असा ग. ह. खरे ह्यांचा तर्क आहे. स्वतःच्या नावापासून तयार झालेले ‘विठ्ठल’ हे नाव त्याने आपल्या उपास्य देवतेला दिले असावे, असेही ग. ह. खरे ह्यांना वाटते.

विठोबाची मूर्ती नेमकी आहे कशी 

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात एकट्या विठोबाचीच मूर्ती आहे. तिच्या डोक्यावर साध्या मुकुटासारखी एक उंच आणि कडा असलेली टोपी आहे. भाविक ह्याच टोपीला वा साध्या मुकुटाला शिवलिंग समजतात. टोपीला जो कंगोरा आहे, त्यास पुजारी पाठीवर टाकलेल्या शिंक्याची दोरी, असे म्हणतात. हरिहरैक्याची उत्कट भावना त्यामागे दिसते. ह्या मूर्तीचा चेहरा उभट असून डोक्यावरील उंच टोपीमुळे तो अधिकच उभट वाटतो. मूर्तीच्या कानांत मत्स्याकाराची कुंडले आहेत. तथापि ती फार मोठी असून खांद्यांवर आडवी पसरलेली असल्यामुळे ते खांद्यांचे अलंकार आहेत, असा समज होतो. विठोबाच्या गळ्यात कौस्तुभमण्यांचा हार आहे. छातीच्या डाव्या भागावर एक खळगी आणि उजव्या भागावर एक वर्तुळखंड आहे. त्यांना अनुक्रमे श्रीवत्सलांछन व श्रीनिकेतन ही नावे देण्यात आली आहेत. मूर्तीच्या दंडावर आणि मनगटावर दुहेरी बाजूबंद व मणिबंध आहेत. दोन्ही हात कमरेवर आहेत. डाव्या हातात शंख असून उजव्या हातात कमलनाल (कमळाचा देठ) आहे. त्याचा टोकाशी असलेली कळी विठ्ठलाच्या मांजीवर लोळत आहे. हा हात उताणा आणि अंगठा खाली येईल, अशा प्रकारे कमरेवर ठेवला आहे. कमरेस तिहेरी मेखला आहे. दोन पायांना जोडणारा असा एक दगडी भाग पायांमध्ये आहे. त्यास ‘काठी’ असे म्हणतात.

कमरेवर वस्त्र असल्याच्या खुणा दिसत नाहीत असे मूर्तीकडे पाहताा वाटते. संतांनीही विठोबाला अनेकदा ‘दिगंबर’ म्हटले आहे. काहींच्या म्हणण्यानुसार विठोबाच्या कमरेस वस्त्र आहे, असे मानल्यास काठीस विठ्ठलाच्या वस्त्राचा सोगा म्हणता येईल व हा सोगा मूर्तीच्या पावलांपर्यंत आलेला आहे, असेही म्हणता येईल. ही पावले एका चौकोनावर असून त्यालाच ‘वीट’ म्हणतात. ह्या विटेखाली उलटे कमळ आहे. शिंक्याची दोरी व काठी अशा ज्या वस्तू दाखविल्या जातात, त्या खरोखरीच तशा आहेत, असे ग.ह. खऱ्यांसारख्या इतिहासज्ञाला वाटत नाही.

1659 साली झालेल्या अफजलखानाच्या स्वारीवेळी मूर्ती सुरक्षित ठेण्यासाठी चिंचोली, गुळसरे, देगाव ह्यांसारख्या पंढरपूरच्या गावांत हलवण्यात येई, असे दिसते. अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी मूर्ती पंढरपूरजवळच असलेल्या माढे गावात नेऊन ठेवली होती. अफजलखानाचा वध झाल्यानंतर ती तेथून पुन्हा पंढरपूरात आणली, असे इतिहासाचार्य राजवाडे ह्यांनी म्हटले आहे. त्यानंतर ह्या संकटाचे स्मरण म्हणून माढे येथे विठोबाचे एक स्वतंत्र देऊळ आणि मूर्ती स्थापण्यात आली, असेही राजवाडे सांगतात. 

(सदर माहिती ही मराठी विश्वकोषातून घेतली आहे)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here