सेनेचे खासदारदेखील आमदारांच्याच वाटेनं जात असल्याचं दिसत आहे. भाजपसोबत युती करण्याची भूमिका शिवसेनेच्या १५ खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे मांडली. आता यासंदर्भात ठाकरे काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

हायलाइट्स:
- भाजपसोबत जाण्यासाठी सेनेचे खासदार आग्रही
- आमदारांपाठोपाठ खासदारांच्या मनात असंतोष
- उद्धव ठाकरेंसमोर आता नवा पेचप्रसंग
काँग्रेस, राष्ट्रवादीसोबतची सोयरिक मान्य नाही असं म्हणत शिवसेनेचे ४० आमदार सत्तेतून बाहेर पडले. त्यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. एकनाथ शिंदेंनी बंडाचं नेतृत्त्व केलं. भाजपच्या पाठिंब्यानं ते मुख्यमंत्री झाले. आता शिवसेनेचे खासदारदेखील आमदारांसारखीच भूमिका मांडू लागले आहेत.
शिवसेना, भाजपचे खासदार काँग्रेस, राष्ट्रवादीच्या विरोधात लढून विजयी झाले आहेत. त्यामुळे आपण भाजपसोबत जाऊया, अशी भूमिका शिवसेनेच्या १५ खासदारांनी पक्षप्रमुखांसोबत झालेल्या बैठकीत मांडल्याचं शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी सांगितलं. आम्ही उद्धव ठाकरेंकडे भूमिका मांडलेली आहे. यासंदर्भात आता उद्या पुन्हा बैठक होणार आहे. त्यातदेखील आम्ही आमची भूमिका मांडू, असं लोखंडे म्हणाले.
शिवसेनेच्या खासदारांच्या मनात नेमकं काय?
शिवसेनेच्या दोन तृतीयांश आमदारांनी भाजपच्या मदतीनं सरकार स्थापन केल्यानंतर आता खासदारांच्या मनात चलबिचल सुरू झाली आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या खासदारांनी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मूर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी शिवसेनेचे मुंबईतील खासदार राहुल शेवाळेंनी ठाकरेंकडे पत्र लिहून केली. याआधी शिवसेनेनं एनडीएत असताना काँग्रेसप्रणित यूपीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेगवारांना पाठिंबा दिल्याची आठवण शेवाळेंनी पत्रातून करून दिली आहे.
त्याआधी यवतमाळच्या खासदार भावना गवळींनी ठाकरेंना पत्र लिहिलं होतं. त्यात त्यांनी हिंदुत्त्वाचा उल्लेख करत कठीण असला तरी निर्णय घ्या, असं म्हणत अप्रत्यक्षपणे भाजपसोबत जाण्यासंदर्भात सुचवलं होतं. यानंतर गवळी यांची लोकसभेतील पक्षाच्या प्रतोद पदावरून उचलबांगडी करण्यात आली. ही जबाबदारी राजन विचारेंकडे सोपवण्यात आली. एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी आधीच आपल्या वडिलांच्या समर्थनार्थ आघाडी उघडली आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : after mlas now shiv sena mps wants alliance with bjp 15 mp clears their stand to uddhav thackeray
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network