पंढरपूरमध्ये विठोबा आणि रखुमाई यांच्या मूर्ती एकाच गाभाऱ्यात नाही हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. चंद्रभागेतिरी येणाऱ्या भाविकांना विठूरायाचं दर्शन घेण्यासाठी एका गाभाऱ्यात यावं लागतं तर रूक्मिणीच्या दर्शनासाठी दुसऱ्या गाभाऱ्यात जावं लागतं. विठू रूखमाई असे वेगवेगळे का आहेत हा प्रश्न प्रत्येकाला पडतो आणि त्याचं उत्तर तो मिळवतो. अभिनेता कुशल बद्रिके यानेही जेव्हा पंढरपुरात गेल्यावर विठू रूखमाईचे वेगवेगळे गाभारे पाहिले तेव्हा त्यालाही हाच प्रश्न पडला. प्रश्न तर पडलाच पण कुशल पोहोचला तो त्याच्या बालपणात.
कुशलने याचसंदर्भातील एक पोस्ट शेअर केली आहे. या व्हिडिओमध्ये तो असं म्हणतोय की, मला लहानपणाचे दिवस आठवले. मी दहा वर्षांचा होत. बाबा ऑफीसमधून आले की आमची जेवणं व्हायची आणि ते झोपायची तयारी करायचे. पण आईला जेवणानंतर सगळं आवरावं लागायचं. भांडी घासून, लावून तिला झोपायला वेळ व्हायचा. त्यावरून बाबा चिडचिड करायचे. एकदा खूप चिडून बाबा दुसऱ्या खोलीत झोपायला लागले. पण मला हे सहनच होईना की आईबाबा माझ्यासोबत झोपत नाहीत. मग मी हट्टाला पेटलो आणि माझ्या हट्टाखातर आईबाबा पुन्हा माझ्यासोबत एकत्र झोपायला लागले. त्यानंतर मी जेव्हा पंढरपूरला गेलो तेव्हा विठू रूखमाई एकत्र नाहीत ही गोष्ट मला खूप मनाला लागली.
कुशलने त्याच्या बालपणातील ही आठवण आणि विठू रखुमाईचं वेगवेगळया गाभाऱ्यात असणं याचा अर्थ एका कवितेतूनही मांडला आहे. विठू सोबत नाही म्हणून रखुमाईला काय वाटत असेल हे कुशलने त्याच्या कवितेतून सांगितले आहे. त्याची वाट बघण्यात रखुमाईचा जन्म गेला, देवा देवपणापेक्षा तिच्यासोबत रहा असंही कुशलने त्याच्या कवितेतून सांगितलं आहे. कुशलच्या आयुष्यात घडलेला एक प्रसंग आणि विठू रूक्मिणीची ताटातूट यांचा धागा गुंफत कुशलने व्यक्त केलेल्या या भावना कुशलच्या चाहत्यांच्या मनाचा ठाव घेत आहेत.