सोलापूर : पंढरपुरात रविवारी आषाढी एकादशीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांमुळे विठुरायाची पंढरी फुलून गेली होती. मात्र चंद्रभागेत स्नान करत असताना नागपूर जिल्ह्यातील दोन तरुणांवर काळाने घाला घातला असून या तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. नागपूरमधील तीन तरुण पंढरपूरला आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते. यातील दोन तरुणांचा चंद्रभागा नदीत स्नान करत असताना पाण्यात बुडाले. सचिन शिवाजी कुंभारे (२८, रा. जलालखेडा, जि. नागपूर) आणि विजय सिद्धार्थ सरदार (२७, रा. नारसिंगी जि. नागपूर) अशी मृत युवकांची नावे आहेत. दोघांचे मृतदेह पंढरपूर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहेत.

नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील जलालखेडा आणि नारसिंगी येथील तीन युवक आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरपूरला आले होते. रविवारी सकाळी ते रेल्वेने पंढरपूर येथे पोहोचले. विठुरायाच्या दर्शनाआधी चंद्रभागा नदीत स्नान करावे असे या तीनही मित्रांनी ठरवले. सचिन कुंभारे आणि विजय सरदार हे दोघे अंघोळीसाठी चंद्रभागा नदी पात्रात उतरले. परंतु, पाणी जास्त असल्यामुळे सचिन बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी गेलेला विजयसुद्धा पाण्यात बुडाला.

विठुरायाच्या दर्शनाला येताना भाविकांवर काळाचा घाला, कासेगाव फाट्यावर अपघात, दोघांचा मृत्यू

सचिन आणि विजय हे दोघे मित्र बुडत असल्याचे नदीपात्राबाहेर उभ्या असलेल्या तिसऱ्या दिसले. त्याने आरडाओरड केल्याने आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. काही नागरिकांनी नदीत उडी घेत सचिन व विजय यांना पाण्यातून बाहेर काढलं आणि रुग्णालयात नेलं. परंतु, तेथे डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. आषाढी एकादशीलाच घडलेल्या या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here