सर्वोच्च न्यायालयातील सोमवारच्या कामकाजात या प्रकरणाचा समावेश नसल्याने ही सुनावणी लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. सुनावणीची तारीख निश्चित करण्यासाठी शिवसेनेचे वकील आज सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय पीठाला विनंती करणार असल्याची माहिती आहे. सर्वोच्च न्यायालयाची सुट्टी संपून नियमित कामकाज सोमवारपासून सुरू होत आहे. सरन्यायाधीश एऩ व्ही़ रमण यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय पीठाची कार्यसूची रविवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे गटाच्या प्रकरणाचा सुनावणीसाठी समावेश नाही. या याचिका अन्य कोणत्याही खंडपीठाकडे वर्गही करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे त्यासंदर्भात सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता नाही, असे सूत्रांनी सांगितले. आता ही सुनावणी मंगळवारी किंवा बुधवारी होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दोघांनाही न्यायव्यवस्थेवर विश्वास
सर्वोच्च न्यायालयात आज, सोमवारी होणाऱ्या सुनावणीत आपलाच विजय होईल, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ‘माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. सुनावणीचा जो काही निकाल येईल तो शिवसेनेच्या भविष्याचा निकाल नसेल. पण देशात लोकशाहीचे भविष्य किती काळ मजबूत राहणार आहे, डॉ. आंबेडकरांच्या राज्यघटनेनुसार कारभार होणार आहे का, हे सर्व या निकालामधून स्पष्ट होईल’, असे मत उद्धव ठाकरे यांनी मांडले आहे. तर, ‘न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. आम्ही काहीही चुकीचे केले नाही. आम्हीच शिवसेना आहोत, हे लवकरच सिद्ध होईल’, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.