येत्या १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक होत आहे. यूपीएकडून यशवंत सिन्हा तर एनडीएतर्फे द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याच निवडणुकीत भाजपच्या द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी सेनेमधील काही खासदारांची मागणी आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना तसं पत्र लिहिलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर पक्षातील पडझडीला सावरण्यासाठी उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे मोठ्या ताकदीने मैदानात उतरले आहेत. आता खासदारांचं म्हणणं ऐकून घेऊन, त्यावर मंथन करुन उद्धव ठाकरे एक पाऊल मागे येऊ शकतात किंबहुना द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देऊ शकतात, असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
एनडीएमध्ये असूनही दोनवेळा शिवसेनेने यूपीएच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. २००७ साली प्रतिभा ताई पाटील आणि नंतर प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला. अजून तरी शिवसेना राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आहे तसेच २ वर्षांपूर्वीच शिवसेना एनडीएमधूनही बाहेर पडली आहे. युती-आघाडी न बघता उमेदवार पाहून पाठिंबा देण्याचा शिवसेनेचा मागील इतिहास आहे. द्रौपदी मुर्मू यांची पार्श्वभूमी व सामाजिक क्षेत्रातील कार्य लक्षात घेता शिवसेना पाठिंबा देऊ शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दुसरीकडे शिवसेनेचे १२ खासदार वेगळा विचार करण्याच्या तयारीत आहेत, असं वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिल्यानंतर शिवसेनेच्या गोटात हालचाली वाढल्या आहे. खासदारांच्या दबावाआधी त्यांची मन की बात ऐकून घेऊन, मंथन करुन त्यावर निर्णय घेण्याच्या तयारीत पक्षप्रमुख आहेत.
१० खासदार ‘मातोश्री’वर
संजय राऊत
गजानन कीर्तिकर
अरविंद सावंत
विनायक राऊत
हेमंत गोडसे
प्रियांका चतुर्वेदी
धैर्यशील माने
राहुल शेवाळे
श्रीरंग बारणे
अनिल देसाई