पोलिसांनी महिलेच्या घराशेजारील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासले. हत्याकांड होण्याआधीच्या रात्री साडे नऊ वाजता एक संशयास्पद व्यक्ती घरात शिरताना दिसला. त्यानं स्वत:चा चेहरा पांढऱ्या टॉवेलनं झाकला होता. त्यानंतर रात्री साडे अकरा वाजता तो घरातून बाहेर पडला. रात्री १२ च्या सुमारास तो पुन्हा घरात शिरला आणि काही वेळानंतर बाहेर आला.
संशयास्पद व्यक्तीचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी महिलेच्या कुटुंबातील सदस्यांना दाखवलं. हा संशयास्पद व्यक्ती मृत महिलेचा नातूच असल्याचं सदस्यांनी ओळखलं. यानंतर पोलिसांनी नातवाला अटक केली. त्याच्या चौकशीतून धक्कादायक गोष्टी समोर आल्या. शाळेत त्याची मैत्री चार मुलांशी झाली. त्यांच्याकडून त्यानं बरीच रक्कम उधार घेतली होती. चार जण ते पैसे परत मागत होते, असं आरोपी नातवानं पोलिसांना सांगितलं.
माझ्याकडे पैसे नाहीत. पण माझी आजी एकटीच राहते. तिनं नुकतीच तिची संपत्ती विकली आहे. संपत्ती विकून आलेले पैसे तिच्याकडे आहेत. ती पैसे देऊ शकते आणि न दिल्यास तिची हत्या करून घरातून रोख रक्कम लंपास करता येऊ शकते, असं नातवानं मित्रांना सांगितलं. यानंतर नातू आणि त्याच्या मित्रांनी एक योजना आखली. अल्पवयीन नातू आजीच्या घरी पोहोचला. त्यानं तिच्याकडे पैसे मागितले. तिनं पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे नातवानं आजीचा गळा चिरला. हत्येनंतर त्यानं मित्रांना व्हिडीओ कॉल करून मृतदेह दाखवला. खून केल्यावर नातवानं आजीच्या घरातून दीड लाख रुपये लुटले आणि मित्रांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड केली.