सप्तश्रृंगी गड येथे ढगफुटी झाल्याने मंदिराच्या उतरत्या पायरीवर अचानक मोठ्या प्रमाणावर पाणी आले. त्यामुळे भाविक खाली पडून किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर नांदुरी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पावसाचा जोर टिकून असल्याने आज दुपारी २ वाजेपासून धरणातून १० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात करण्यात येत आहे. यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होऊन नदी काठच्या गावांना सतर्क करण्यात आले आहे.
मालेगाव, मनमाड, सटाणा यासह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही भागात मुसळधार पाऊस होत आहे. सलग जोरदार पाऊस होत असल्याने नदी, नाले, ओढ्यांना पूर आला असून पुराचे पाणी पूल आणि रस्त्यावरून वाहत असल्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे.