साक्री तालुक्यात ढगफूटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे या परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे. जोपर्यंत पुलावरील पाणी ओसरत नाही तोपर्यंत या नागरिकांना पुलाच्या दुसऱ्या बाजूलाच पुराचे पाणी कमी होण्याची वाट बघावी लागणार आहे. ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने गावात पुराचे पाणी घुसल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली आहे. शिवाय साक्री शहरातून वाहणारी पांझरा व कान या दोन्ही नद्यांनी अक्षरशः रौद्ररूप धारण केलं असून कान नदीला पूर आल्याने नदीवरील दोन पूल हे संपूर्ण पाण्याखाली गेले आहे.
साक्री शहरातील नदीकाठी असलेल्या घरांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने नदीपात्रापासून दूर जाण्याचे आवाहन केलं आहे. नदीपात्रात अक्कलपाडा धरणातून अजून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित स्थळी जावे, असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.