khed floods latest news, रत्नागिरीत पुन्हा पूरस्थिती; खेडमधील बाजारपेठेत शिरलं पाणी; पुढील ३ दिवस जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’ – ratnagiri flood jagbudi river water in khed market red alert’ for next 3 days
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. परिणामी नदीतील पाणी थेट खेड शहरातील मटण मार्केटजवळ पोहोचलं आहे. पुन्हा एकदा पुराची स्थिती निर्माण झाल्याने खेड शहरातील नागरिकांची चिंता वाढली आहे.
एकीकडे जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली असतानाच दुसरीकडे हवामान खात्याकडून रत्नागिरी जिल्ह्याला पुढील तीन दिवसांसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात १२ ते १५ जुलै या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील तीन दिवस दक्षिण महाराष्ट्र, कोकण, गोवा किनाऱ्यावर ताशी ४५-५५ कि.मी ते ६५ कि.मी. वेगाने वादळी वारे वाहतील आणि मुसळधार पाऊस कोसळेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे खेडसह जिल्ह्यातील इतर भागांना पुन्हा महापुराचा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुंबईत पावसाचे धुमशान; वाहतूक पोलिस अॅक्शन मोडमध्ये, रस्त्यावरील खड्ड्यांचे ॲलर्ट देणार
दरम्यान, जिल्ह्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी. मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जावू नये, असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
हवामान खात्याचा इशारा लक्षात घेऊन चिपळूण नगर परिषद प्रशासनानेही नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी सतर्क रहावे, कोणत्याही मदतीकरिता आपल्या विभागातील पथक प्रमुख अथवा नगर परिषद आपत्ती नियंत्रण कक्षामध्ये सपंर्क करावा, असं आवाहन केलं आहे. यासाठी ०२३५५-२६१०४७/ ९११२२६१०४७ हे क्रमांक देण्यात आले आहेत.