रत्नागिरी : रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील नाणीज येथे सोमवारी सकाळी एक धक्कादायक प्रकार घडला. या मार्गावरील वीज वाहिनीवर दोन झाडे उन्मळून पडल्याने वीज खांब विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका खाजगी वाहनावर (एम एच ०८ ए पी १२८६) पडला. हा प्रकार लक्षात येताच स्थानिक ग्रामस्थ तातडीने मदतीला पोहोचले आणि विद्यार्थी व वाहनचालकाला वाहनातून सुखरूप बाहेर काढले. महावितरणकडूनही या घटनेची गंभीर दखल घेत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन प्रत्येकाची विचारपूस करण्यात आली. या दुर्घटनेत वाहनचालकासह विद्यार्थीही थोडक्यात बचावले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पाली व साखरण या दोन उपकेंद्राना जोडणारी आणि सद्यस्थितीत बंद अवस्थेत असलेली मात्र पर्यायी वीज व्यवस्था करण्यासाठी उच्चदाब वीज वाहिनी नाणीज परिसरात आहे. या वीज वाहिनीवर वादळी वाऱ्यामुळे गुलमोहर व आंबा हे दोन जुने वृक्ष उन्मळून पडल्याने वीज खांब विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनाच्या समोरील भागावर आदळला.

ग्रामस्थ व महावितरण कर्मचाऱ्यांनी वीज खांब हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करून दिला. उपकार्यकारी अभियंता ओंकार डांगे, पालीचे शाखा अभियंता धनाजी कळेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील कामकाज पाहिले. तसंच विद्युत निरीक्षक यांना घटनेची माहिती कळवण्यात आली आहे.

नाशिकमध्ये एका दिवसात रेकॉर्डब्रेक पाऊस; पावसाने मोडला पाच वर्षांचा रेकॉर्ड

दरम्यान, या दुर्घटनेत मैथिली भरवडे (वय ११ वर्ष),आरुषी बागवे (वय १२ वर्ष), सुरज दाभोळकर (वय १५ वर्ष), विराज भरवडे (११ वर्ष), यश भरवडे (१२ वर्ष – सर्व रा. नांदिवली) आणि वाहनचालक प्रशांत पांचाळ (वय ३९ वर्ष) यांची डॉ.संदिप रसाळ यांनी तपासणी केली असून सर्व विद्यार्थी व चालक सुखरूप आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here