पिंपरी: राज्यभरात सध्या जोरदार पाऊस कोसळत असून या पावसाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटनस्थळांवर मोठी गर्दी होत आहे. मावळ परिसरातील कुंडमाळ येथेही पर्यटकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र सोमवारी या परिसरात एक तरुण अचानक नदीत पडला आणि वाहून जाऊ लागला. त्यानंतर वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या रेस्क्यू टीमने केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे या तरुणाला वाचवण्यात यश आलं आहे. रोहन किसन सोनटक्के (वय २२) असं वाचवण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे.

कुंडमाळ येथे पर्यटनासाठी आलेल्या तरुणाला नदीतील पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने तो प्रवाहासोबत वाहून जाऊ लागला होता. या परिसरातील पर्यटकांवर लक्ष ठेवण्यासाठी तैनात असणाऱ्या मावळ संस्थेच्या रेस्क्यू टीमने तातडीने धाव घेतली आणि क्षणाचाही विलंब न लावता ही टीम तरुणाच्या मदतीसाठी पाण्यात सेफ्टी बोट घेऊन उतरली. या टीमने काही अंतर पार केल्यानंतर वाहून जाणाऱ्या तरुणाला गाठण्यात यश मिळवले आणि त्याला पाण्यातून बाहेर काढले.

सदर तरुण बऱ्याच काळ पाण्यात असल्याने त्याच्या नाकात आणि तोंडात पाणी जाऊन तो बेशुद्ध झाला होता. त्यामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र त्यानंतर रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले आणि त्याला जीवदान दिले. या कामगिरीबद्दल वन्यजीव रक्षक मावळ टीमचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

दरम्यान, पर्यटनस्थळी आलेल्या नागरिकांनी आपल्या सुरक्षिततेची काळजी घेऊन निसर्गाचा आनंद लुटावा, असं आवाहन या दुर्घटनेनंतर प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here