राज ठाकरे यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्यांना डॉक्टरांनी साधारण तीन महिने सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितले होते. मात्र, सद्य राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला होता. राज ठाकरे लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी ते सद्य राजकीय परिस्थिती आणि आगामी नगरपालिका निवडणुकांसंदर्भात काय बोलणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
पूर आलेल्या भागात मदतकार्य हाती घ्या, राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पूरस्थिती निर्माण झाल्यास त्याठिकाणी मदतकार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.तुम्ही स्वतःची तर काळजी घ्याच परंतु अतिवृष्टीमुळे जिथे लोकांना त्रास होतो आहे तिथेही तुम्ही लोकांसाठी जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करा. मुख्यतः नदीकाठाला जिथे लोक रहात आहेत तिथल्या घरांमध्ये पाणी घुसण्याची शक्यता आहे. सांगली – कोल्हापूरकडचा आत्ता-आत्ताचा पूर तुम्हाला आठवतोय ना? काही लोकांना तात्पुरत्या निवासात हलवायला लागू शकतं. तिथे अन्नधान्य, पिण्याचं शुध्द पाणी, अंथरूण-पांघरूण (सर्वत्र ओल असते) पुरवावं लागेल. मुख्यतः वृध्द, गरोदर महिला, अपंग आणि लहान मुलं ह्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. झाडं उन्मळून पडतात, ती नंतर पुन्हा लावावी लागतील. अशा खूप गोष्टी आहेत. एक लक्षात घ्या की अशा परिस्थितीत सरकारी यंत्रणा प्रचंड कामात असतात त्यामुळे त्यांच्यावर विनाकारण ताण येईल असं काहीही करू नका, असे राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे.