Hingoli Earthquake : मुसळधार पाऊस सुरू असतानाच हिंगोलीत भूकंपाचे धक्के; भरपावसात नागरिक रस्त्यावर – hingoli rains earthquake in vasmat taluka citizens on the road latest updates
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात वापटी, कुपटी, शिरळी, खापरखेडा राजवाडी, खंबाळा, चोंडी बहीरोबा आणि इतर काही गावांमध्ये सकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. तसंच नंतर ८ वाजून १७ मिनिटांनी भूकंपाचा दुसरा धक्का बसला. त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
भूकंपाच्या धक्क्याने भयभीत झालेले नागरिक भरपावसात घराबाहेर पडले आणि रस्त्यावर जाऊन उभे राहिले. या परिसरात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नागरिकांची दैना झालेली असतानाच भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांना दुहेरी त्रास सहन करावा लागत आहे. या भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यावं, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे. काही जीवितहानी व वित्तहानी होण्यापूर्वी प्रशासनाने वेळीच याची दखल घेतली तर होणारा धोका टळू शकेल, अशी भावना सुद्धा गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आषाढी एकादशीला चंद्रभागेत स्नान करताना दोन मित्रांवर काळाचा घाला; बुडून मृत्यू
दरम्यान, भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता किती होती, हे मात्र अद्यापपर्यंत समजू शकले नाही.
सोलापुरातही जाणवले होते भूकंपाचे धक्के
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यातील काही गावांमध्ये ९ जुलै रोजी भूकंपाचे धक्के जाणवले होते. ४.६ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा हा भूकंप होता.