कलम १७(१)
आपल्या देशात आपण जी कमाई करतो त्यावर आपल्याला प्राप्तिकर द्यावा लागतो. विविध उत्पन्नस्रोतांपैकी प्राप्तिकरांतर्गत सहज येणारा उत्पन्नस्रोत म्हणजे आपल्याला मिळणारे वेतन किंवा पगार (सॅलरी). याचे मोजमाप प्राप्तिकर विवरणपत्रासाठी उपयुक्त असलेल्या फॉर्म-१६ मध्ये दिलेले असते. यासाठी प्राप्तिकर कलम १७(१) पाहिले जाते.
वेतन किंवा पगार (सॅलरी)
प्राप्तिकर विवरणपत्र भरताना उत्पन्नाच्या रकान्यात सर्वाधिक दिसणारा घटक म्हणजे वेतन किंवा पगार (सॅलरी). उत्पन्न हा रकाना म्हणजे करदात्याने करवर्षात कमावलेला पैसा दाखवणारा रकाना. या रकान्यामध्ये घरापासून मिळणारे उत्पन्न, भांडवली लाभापासून मिळणारे उत्पन्न, अन्य स्रोतांपासून मिळालेले उत्पन्न इत्यादींचा समावेश होतो. यातल्या वेतन या उत्पन्नस्रोताचा समावे कलम १७(१) मध्ये केलेला आहे.
वेतनाचे घटक
प्राप्तिकर कलम १७(१) नुसार मोबदला, आगाऊ दिलेले वेतन, मोबदल्याच्या रूपातील कोणतेही शुल्क, कमिशन, अनुषंगिक लाभ किंवा अनुलाभ (पर्क्विझिट्स), वेतनाऐवजी होणारे किंवा वेतनाशिवाय होणारे लाभ किंवा नफा इत्यादींचा समावेश वेतन या गटात होतो. मात्र जर तुम्हाला भागीदार या नात्याने वेतन मिळाले असेल तर त्याचा समावेश कलम १७(१) मध्ये वेतन या अंतर्गत होत नाही.
कलम १७(१) अंतर्गत येणारे विविध वेतनप्रकार
– मजुरी (वेजेस), वार्षिकी किंवा पेन्शन, उपदान (ग्रॅच्युइटी), आगाऊ वेतन, न घेतलेल्या रजांचे पैसे.
– शुल्क (फी), कमिशन, अनुषंगिक लाभ किंवा अनुलाभ (पर्क्विझिट्स), वेतनाऐवजी किंवा मजुरीऐवजी होणारे किंवा वेतनाशिवाय किंवा मजुरीशिवाय होणारे लाभ किंवा नफा.
– राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत केंद्र सरकार किंवा अन्य रोजगरादात्याने (एम्प्लॉयर) दिलेले योगदान.
– मान्यताप्राप्त भविष्यनिर्वाह निधीमध्ये (प्रॉव्हिडन्ट फंड) झालेली वार्षिक वाढ.