‘राष्ट्रपती निवडणुकीत भाजपला मदत करावी’
येत्या १८ जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याबाबत सध्या शिवसेनेच्या गोटात खलबतं रंगत आहे. या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री येथे झालेल्या बैठकीत राष्ट्रपती निवडणुकीसाठी भाजपला मदत करावी, अशी मागणी खासदारांनी केल्याचं हेमंत गोडसे यांनी सांगितलं आहे. ‘द्रौपदी मुर्मू या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती होणार असतील तर आपण पाठिंबा द्यायला पाहिजे असं आम्ही सांगितलं. त्यावर विचार करू असं उद्धवजी म्हणाले,’ असं खासदार गोडसे यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.
शिवसेनेत दोन गट?
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीवरून शिवसेनेत दोन गट पडल्याची माहिती आहे. बहुसंख्य खासदारांनी भाजपला पाठिंबा देण्याची मागणी केली असताना, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मात्र केंद्रातील विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना समर्थन देण्याची मागणी लावून धरली. त्यामुळे जवळपास सर्वच खासदारांनी राऊत यांना कडाडून विरोध केल्याचे समजते. अखेर याबाबतच्या निर्णयाचे सर्वाधिकार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात आले. या बैठकीला लोकसभा आणि राज्यसभेतील शिवसेनेच्या २२ खासदारांपैकी ७ खासदार अनुपस्थित राहिल्याने चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे मुर्मू यांच्या पाठिंब्याचाच निर्णय घेतील, असे समजते.