अकोला: यंदा भाविकांसाठी काळ ठरू लागले असताना विविध रेस्क्यू पथकांनी १३४ भाविकांचे प्राण वाचवल्याचे पुण्यकर्म केले. अशाच एका धक्कादायक घटनेत पाण्यात अगदी मृत्यू समोर दिसत असताना दोन भावंडांना अकोला येथील रेस्क्यू पथकाने वाचवले. आता आपण बुडणार म्हणून एकमेकांना मिठी मारली. अगदी कपाळापर्यंत बुडालेल्या अवस्थेत असतानाच पिंजर जिल्हा अकोला येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या जवानांनी चक्क मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले.

इस्काॅन घाटाच्या डाव्या बाजूला नदीच्या काठावर उभे असलेले वारकरी धावा धावा असे जोर जोरात ओरडू लागले. तेव्हा जीवरक्षक दीपक सदाफळे आणि टीम यांनी मागे पाहताच दोन भाऊ चंद्रभागा नदीच्या मध्यभागात बुडताना दिसले. दम सरल्याने दोघांनीही गटांगळ्या खायला सुरवात झाली. आता आपले काही खरे नाही अशी खात्री होताच दोघाही भावंडानी एकमेकांना मिठ्या मारुन पकडले तेव्हा कोणी मदतीला धावून येईल तरच आपण जिवंत राहू अशी परिस्थिती त्यांच्या हालचालीवरुन जाणवत होती. त्याचवेळी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे जवान तिथे पोहोचले आणि दोन्ही भावंडांना मृत्यूच्या दारातून सुखरुप आणले.

आपत्कालीन प्रसंग समोर येताच जीवरक्षक दिपक सदाफळे यांनी आपली रेस्क्यू बोट त्या दिशेने वळविली आणि लगेच टाॅपर अंडर वाॅटर स्विमर पथकाचे जवान ज्ञानेश्वर म्हसाये,अतुल उमाळे यांना स्टॅण्डबाय होऊन पोजिशन घ्यायला सांगितले आणि दुसऱ्या बोटीवरील कर्मचारी प्रज्वल प्रचंडराव यांना दोन लाईफरींग घेऊन त्या भावंडांजवळ फेकण्यासाठी पोजिशन घेण्यास सांगितले. अवघ्या एका मिनिटात त्या भावंडांजवळ रेस्क्यु बोट नेत लगेच त्या दिशेने लाईफ रिंग फेकल्या आणि क्षणार्धात दोन्ही स्विमरनी पाण्यात झेपावत दोन्ही भावंडांना वाचवले. जितेंद्र अजयकुमार कहाळ आणि भाऊ अभिजीत अजयकुमार कहाळ (ता. विरार पालघर) अशी दोन भावंडांची नावे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here