मुंबई : दररोज कुणी ना कुणी शिवसेना-उद्धव ठाकरेंची साथ सोडत असताना आज ‘मातोश्री’साठी दिलासादायक बातमी आली आहे. धुळे ग्रामीणचे माजी आमदार शरद पाटील यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शरद पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रीमध्ये प्रमुख शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. फक्त आनंदाच्या क्षणीच नाहीतर संकटाच्या काळात देखील कायम मी आपल्यासोबत असेन असं वचन त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं.

माजी आमदार शरद पाटील याआधीही शिवसेनेत होते. मात्र उमेदवारी नाकारल्याने त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली होती. मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना पक्षात मोठी फूट पडली. मरेपर्यंत भगवा सोडणार नाही, ठाकरेंची साथ सोडणार नाही, अशा वल्गना करणाऱ्या आमदारांनी देखील एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणं पसंत केलं. महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागातून सेनेचे आमदार शिंदे यांच्या गटात गेले. एकंदरित सध्या शिवसेनेसाठी संकटाचा काळ सुरु असताना माजी आमदार शरद पाटील यांचा सेना प्रवेश धुळे ग्रामीण शिवसेनेसाठी मोठी घडामोड आहे.

शिंदे-फडणवीसांनी आयोगाशी चर्चा करुन नगरपालिका निवडणुकांना स्थगिती द्यावी : पंकजा
कोण आहेत शरद पाटील?

-माजी आमदार प्रा. पाटील यांनी २२ ऑक्टोबर २००३ ला काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली.

-त्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून धुळे ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसचा पाडाव केला.

-उमेदवारी नाकारल्याने त्यांनी १ ऑक्टोबर २०१९ ला शिवसेनेला रामराम ठोकला.

-त्यानंतर त्यांनी ३ जून २०२१ ला काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश घेतला.

-त्यानंतर आज १२ जुलै २०२२ ला त्यांनी पुन्हा घरवापसी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here