प्रेक्षकांना मनोरंजन क्षेत्राबद्दल प्रचंड आकर्षण आहे. चित्रपटाचं चित्रीकरण कसं होतं इथपासून ते त्यांना सेटवर काय काय खायला मिळतं इथपर्यंत. चाहत्यांना कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायलाही आवडतं.ते काय खातात, किती शिक्षण झालंय हे सगळं जाणून घेण्याची चाहत्यांना इच्छा असते.
रणबीर कपूरनं नुकताच त्याचा दहावीचा किस्सा सांगितला आहे. यात तो म्हणतो, ‘मला अभ्यासात फारसा रस नव्हता. बोर्डाच्या परीक्षेत मला ५३.४ टक्के गुण मिळाले होते. तसा कपूर खानदानात दहावी पास झालेला मी पहिलाच मुलगा होतो. त्यामुळं माझ्यासाठी जोरदार पार्टी झाली.’
रणबीरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर लागोपाठ सिनेमे प्रदर्शित होणार असतील तर तो कलाकार नेहमीच चर्चेत असतो. सध्या असंच काहीसं झालंय रणबीरचं. लग्न, एक-दीड महिन्यांच्या अंतरावर प्रदर्शित होणारे दोन सिनेमे, वडील होण्याची बातमी अशा सर्व कारणांनी तो चर्चेत आहे.
‘शमशेरा’ आणि ‘ब्रह्मास्त्र’ या दोन सिनेमांतून आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळ्या व्यक्तिरेखांमध्ये तो दिसणार आहे. रणबीरचा चाहतावर्ग प्रचंड आहे; पण तो कोणाचा चाहता आहे हे त्यानं नुकतंच सांगितलं.
‘लहानपणी मला अमिताभ बच्चन बनायचं होतं. मोठा झाल्यावर मला शाहरुख खान बनावं असं वाटू लागलं. मी मोठा होत गेलो तसतसे हिंदी सिनेमांचे हिरो माझ्या खऱ्या आयुष्यातले हिरो बनत गेले. माझा पोशाख, बोलण्याची पद्धत इतकंच नाही तर मी जे करतो ते सर्व काही याच हिरोंपासून प्रेरित आहे असं बोललं तरी वावगं ठरणार नाही.’ १२ वर्षांच्या करिअरमध्ये हिंदी सिनेमातील हिरोला रणबीर म्हणावा तसा न्याय देऊ शकला नाही, असं तो स्पष्टपणे कबूल करतो.