भंडारदरा परिसरात आदिवासी बांधवांनी हिरवळीवर चरण्यासाठी आणलेल्या शेळ्यांच्या पाठीवरील हे प्लॅस्टिक गोण्यांचे रेनकोट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. शेळीच्या पाठीवर गोणी अंथरायची आणि चारही टोकाला बांधलेल्या दोऱ्या पोटाला बांधल्या की झाला रेनकोट तयार असे हे जुगाड केलेले आहे.

थंडीपासून स्वतःच्या बचावासाठी माणूस विविध उपाययोजना करतो मात्र जनावरांचे काय? असा प्रश्न नेहमीच उपस्थित होतो. गरज ही शोधाची जननी असल्याचे म्हटले जाते आणि याच गरजेतून शेळ्यांच्या रेनकोटचा जन्म झाला. सध्या भंडारदरा परिसरात आदिवासी बांधवांनी हिरवळीवर चरण्यासाठी आणलेल्या शेळ्यांच्या पाठीवरील हे प्लॅस्टिक गोण्यांचे रेनकोट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. शेळीच्या पाठीवर गोणी अंथरायची आणि चारही टोकाला बांधलेल्या दोऱ्या पोटाला बांधल्या की झाला रेनकोट तयार असे हे जुगाड केलेले आहे. या रेनकोटमुळे पाणी व गारठ्यापासून शेळ्यांचा बचाव होतो आहे. या प्लॅस्टिकच्या रेनकोट मुळे आता शेळ्या भिजतही नाहीत आणि गारठ्याने मरण्याचे प्रमाणदेखील कमी झाले आहे.
खरंतर आदिवासी बांधवांच्या दृष्टीने त्यांची जनावरे म्हणजे कुटुंबातील सदस्यच. आदिवासी भागात आजही अनेक ठिकाणी जनावरे थेट घरात बांधली जातात. त्यामुळे आदिवासी बांधव आणि त्यांची जनावरे यांचा एक वेगळाच जिव्हाळा असतो. पावसाळ्यात स्वतःच्या संरक्षणासाठी आदिवासी बांधव जशी बांबूची किंवा प्लॅस्टिकची घोंगडी बनवतात, अगदी त्यांच पद्धतीने प्लॅस्टिकच्या रेनकोटमुळे शेळ्यांचे गारठ्यापासून बचाव करण्याचे त्यांचे हे जुगाड कमालीचे यशस्वी झाले आहे.
पावसाळा सुरू झाला की डोंगर दऱ्यांमध्ये फुलणारे निसर्ग सौंदर्य आपल्याला मोहून टाकते. मात्र याच डोंगर दऱ्यांमध्ये राहणाऱ्या आदिवासी बांधवाचे जिवन तेवढेच कष्टप्रद आणि अडचणींनी भरलेले असते. पावसाळ्यात धो-धो बरसणारा पाऊस आणि त्याच बरोबर झोंबणारा गार वारा यापासून शेळ्यांचा बचाव करण्यासाठी त्यांच्या अंगावर चढवलेले प्लॅस्टिक गोण्यांचे रेनकोट हे नक्कीच आदिवासी बांधवांच्या कल्पकतेचे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Marathi News from Maharashtra Times, TIL Network