मुंबई: शिवसेनेचे हिंगोलीतील आमदार संतोष बांगर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. यावेळी बांगर यांच्यासोबत मोठ्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित होते. तर दुसऱ्या बाजूला हिंगोलीतील शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीला पोहोचले. विशेष म्हणजे हिंगोली जिल्ह्यात सध्या पूरपरिस्थिती आहे. मात्र नेतेमंडळी शक्तिप्रदर्शनात व्यस्त आहे.

हिंगोली जिल्ह्यावरील वर्चस्व दाखवून देण्याचा प्रयत्न ठाकरे आणि शिंदे गटाकडून सुरू आहे. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून आमदार संतोष बांगर यांनी जिल्ह्यातील शिवसैनिकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. बांगर यांनी सह्याद्री अतिथीगृहाबाहेर शिंदेंची भेट घेतली. हिंगोली जिल्ह्यात पूरपरिस्थिती असूनही तिथले शिवसैनिक बांगर यांच्यासोबत मुंबईला आल्याचं शिंदे म्हणाले. बांगर यांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनाचे फोटो शिंदेंकडून ट्विटदेखील करण्यात आले.

दुसरीकडे हिंगोलीतील शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं सेना भवनात जमले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांची भेट घेतली. जिल्ह्यातील तालुकाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य यांच्यासोबत हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील आणि शेकडो शिवसैनिक सेना भवनात हजर होते. जिल्ह्यावरील वर्चस्व दाखवून देण्यासाठी दोन्ही गटांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं.
अमरावती हत्या प्रकरणातील आरोपी राणा दाम्पत्याचा कार्यकर्ता; माजी मंत्र्यांचा गंभीर आरोप
नेते, पदाधिकारी मुंबई दौऱ्यावर अन् जिल्हा वाऱ्यावर
शिंदे आणि ठाकरे गटाकडून शक्तिप्रदर्शन सुरू असताना जिल्हा मात्र वाऱ्यावर आहे. हिंगोलीतील अनेक भागांत सध्या पूरपरिस्थिती आहे. ओढ्यांना पूर आल्यानं काही गावांमध्ये पावसाचं पाणी शिरलं आहे. शेतीचं नुकसान झालं आहे. पावसाची संततधार सुरुच असल्यानं शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. मात्र लोकप्रतिनिधी मुंबईत आहेत. शक्तिप्रदर्शन करण्यात दंग आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here