शिवसेनेतून बंड करीत एकनाथ शिंदे यांच्या गटात ४० आमदार गेले असून, ते पुन्हा पक्षात परतण्याची सध्याच्या घडीला सूतराम शक्यता नाही. अशावेळी फुटलेल्या आमदारांच्या मतदारसंघात शिवसेनेची परिस्थिती मजबूत व्हावी, यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तयारीला लागले आहेत.

हायलाइट्स:
- बंडानंतर उद्धव यांचा बैठकांचा सपाटा
- ‘मातोश्री’वर ३० ते ३५ माजी आमदारांसोबत चर्चा
- ‘एकला चलो रे’चा नारा दिल्याची माहिती
शिवसेनेतील बंडानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाला सावरण्यासाठी बैठकांचा सपाटा लावला असून, याअंतर्गत माजी आमदारांनाची बैठक बोलावण्यात आली होती. ‘मातोश्री’वर दुपारी ही बैठक पार पडली. ३० ते ३५ माजी आमदार यावेळी उपस्थित होते, अशी माहिती मिळते. यावेळी उद्धव यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींचा आढावा घेताना, ‘तुम्हाला विविध प्रलोभने दाखवली जातील, मात्र त्याला बळी पडू नका. आपण राज्यात पुन्हा शिवसेना मजबूत करीत पक्ष फोडणाऱ्यांना धडा शिकवू. तयारीला लागा, संघर्षाची तयारी ठेवा, सगळ्यांना पुन्हा एकदा लढायचे आहे, असे आवाहन केल्याचे समजते. ‘आता आपल्या वारंवार बैठक होणार असून, तुमचे मूळ प्रश्न मार्गी लावले जातील’, असे आश्वासनही उद्धव यांनी या बैठकीत दिल्याच समजते.
राजनाथ यांना ‘जय श्रीराम’ने उत्तर
अरबी भाषेतील ‘अस्सलाम अलैकुम’ हे शब्द मुस्लिमधर्मीय एकमेकांना धार्मिक अभिवादन करण्यासाठी वापरतात. महाविकास आघाडी स्थापन केल्याने उद्धव यांनी हिंदुत्व सोडल्याची टीका होत आहे. याच मुद्द्यावरून डिवचण्यासाठी राजनाथ सिंह यांनी नुकतेच उद्धव यांना अशाप्रकारे अभिवादन केल्याचे समजते. याबाबत बोलताना, ‘राजनाथ यांच्याकडे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत एनडीएतील घटकपक्षात समन्वय राखण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार ते देशभरातील सर्व समविचारी पक्षांच्या प्रमुखांना फोन करून एनडीए उमेदवाराला मतदान करण्याची विनंती करत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मला फोन केला. फोनची सुरुवात करताना त्यांनी ‘अस्सलाम अलैकुम’, असे म्हटले. त्यावेळी आपण त्यांना ‘जय श्रीराम’ असे उत्तर दिले’, असे उद्धव यांनी माजी आमदारांना सांगितल्याचे कळते.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Marathi News from Maharashtra Times, TIL Network