सिंधुदुर्ग : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड करणारे शिवसेनेचे आमदार आपआपल्या मतदारसंघात जोरदार शक्तिप्रदर्शन करत आहेत. सिंधुदुर्गमधील आमदार आणि बंडखोर गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर हेदेखील मंगळवारी सावंतवाडी मतदारसंघात दाखल झाले. समर्थकांनी ‘दीपक केसरकर आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशी घोषणाबाजी करत केसरकर यांचं भव्य स्वागत केले. यावेळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा संवाद सांगताना दीपक केसरकर हे काहीसे भावुक झाले.

‘मी माझ्या मतदारसंघात जाणार असल्याचं जेव्हा मुख्यमंत्र्यांना सांगितलं, तेव्हा लगेच आवश्यकता असेल तर मीही तुमच्यासोबत येतो असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी स्वत:ही माझ्यासोबत येण्याची तयारी दर्शवली. एवढ्या मोठ्या मनाचा माणूस मी आजपर्यंत बघितला नाही. ज्याने आपल्या गटाचं प्रतिनिधित्व केलं, आपली ज्याने बाजू मांडली त्याच्याबरोबर मी सुद्धा त्याच्या मतदारसंघामध्ये गेलं पाहिजे, अशी जर भावना कुठला मुख्यमंत्री ठेवत असतील तर ते महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने न्याय देऊ शकतो,’ असं केसरकर म्हणाले. यावेळी बोलताना केसरकर यांना हुंदका आवरता आला नसल्याचंही पाहायला मिळालं.

उद्धव ठाकरे इन अॅक्शन; पक्षबळकटीसाठी बैठकांचा सपाटा, शिवसैनिकांना दिले महत्त्वाचे आदेश

उद्धव ठाकरेंचं कौतुक

गुरूपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला मतदारसंघात दाखल झालेल्या दीपक केसरकर यांनी त्यांच्या निवासस्थानी साईंच्या पालखीची पूजा केली आणि सावंतवाडी येथून शिंदे गटाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी एनडीएच्या बैठकीसाठी दिल्लीला रवाना झाले. या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबत दीपक केसरकर हे शिंदे गटाची भूमिका मांडणार आहेत. शिवसेनेनंही एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेला हा निर्णय योग्य असल्याचं सांगत दीपक केसरकर यांनी त्यांचं कौतुक केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here