मुंबई : शिवसेनेतील बंडखोरीमुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्रिपदाची खुर्ची गमावण्याची नामुष्की ओढावली. शिवसेना आमदारांच्या बंडामुळे राज्यातील सत्ता गेलेली असतानाच पक्षाचं संघटनही खिळखिळं झालं आहे. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून बैठकांचा सपाटा सुरू आहे. शिवसेना भवनापासून ते मातोश्रीपर्यंत दररोज विविध नेत्यांसोबत खलबतं सुरू आहेत. अशातच विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेनेनं दावा ठोकला असून सदस्यसंख्येनुसार हे पद आम्हाला मिळायला हवं, अशी मागणी महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे करण्यात आली आहे. मात्र शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद मिळाल्यास पक्ष ही जबाबदारी कोणाच्या खांद्यावर सोपवणार, याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू असून काही नावे या पदासाठी स्पर्धेत आहेत.

विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेनेकडून सुरुवातीला अनिल परब आणि सचिन अहिर यांचे नाव आघाडीवर होते. मात्र आता विधानपरिषदेतील शिवसेना आमदार अंबादास दानवे यांचंही नाव या स्पर्धेत आलं आहे. अंबादास दानवे यांनी अनेक वर्ष शिवसेनेचे औरंगाबादचे जिल्हाप्रमुख म्हणून काम पाहिलं आहे. तसंच दानवे हे आपल्या आक्रमक स्वभावासाठी ओळखले जात असल्याने त्यांच्या खांद्यावर शिवसेनेकडून विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते.

बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच, एकनाथ शिंदे यांचं नवं ट्विट

एकनाथ शिंदे यांनी पक्षातून बंडखोरी केल्यानंतर त्यांच्यासोबत शिवसेनेचे तब्बल ४० आमदार गेले आहेत. यामध्ये औरंगाबादच्या चार आमदारांचाही समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेला मोठं खिंडार पडलं आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक वर्षांपासून पक्षसंघटनेसाठी काम करणाऱ्या अंबादास दानवे यांच्यासारख्या नेत्याकडे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते दिल्यास त्यांना ताकद मिळेल आणि याचा जिल्ह्यात शिवसेनेचं संघटन मजबूत करण्यास फायदा होईल, असा विचार शिवसेना नेतृत्वाकडून केला जाण्याची शक्यता आहे.

राष्ट्रपती निवडणुकीसाठीचं साहित्य दिल्लीहून मुंबईत आणलं, विमानात मतपेटीचंही काढलं तिकीट

विधानपरिषदेचं गणित नेमकं कसं आहे?

विधान परिषदेत एकूण ७८ आमदार आहेत. यात आघाडीत शिवसेनेचे सर्वाधिक १३, तर राष्ट्रवादीचे १० आमदार आहेत. त्यामुळे आमदारांच्या संख्याबळानुसार विरोधी पक्षनेतेपदावर आमचा हक्क असल्याची भूमिका शिवसेना नेते सचिन अहिर यांनी मांडली आहे. मात्र, विधान परिषदेत सरकारविरोधात आवाज उठवण्यासाठी अनुभवी नेत्याची गरज आहे. आमच्याकडे एकनाथ खडसेंसारखे सरकारला धारेवर धरू शकणारे अनुभवी नेते आहेत. त्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपदही आम्हालाच मिळावे, असा राष्ट्रवादीचा आग्रह आहे. या पार्श्वभूमीवर नजीकच्या काळात या पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here