sanjay raut vs eknath shinde, ‘बाळासाहेब आज असते तर शिवसेना सोडणाऱ्या एकनाथ शिंदेंना खास शैलीत उत्तर दिलं असतं’ – shivsena leader and mp sanjay raut slams cm eknath shinde over guru purnima 2022
मुंबई : बंडखोरीनंतर शिवसेनेत सुरू झालेला अंतर्गत संघर्ष दिवसागणिक अधिकच धुमसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरू पौर्णिमेचं निमित्त साधत बाळासाहेबांच्या विचारांशी कधीच प्रतारणा करणार नाही, असं ट्वीट केलं. या ट्वीटमधून शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर आता शिवसेनेकडून खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर पलटवार केला आहे.
‘काही लोक शिवसेनेतून बाहेर पडले आणि बाळासाहेब ठाकरे हे आमचे गुरू असल्याचं सांगतात. अशा लोकांना आज बाळासाहेब हयात असते तर त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं असतं,’ असं म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. तसंच बाळासाहेब ठाकरे हे आमच्या सगळ्यांचे गुरू होते. ज्यांची ज्यांची शिवसेनेवर, महाराष्ट्रावर आणि देशावर निष्ठा आहे त्या सगळ्यांचे गुरू बाळासाहेब होते. एकनिष्ठेने त्यांच्यासोबत राहणं हीच खरी गुरुदक्षिणा, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
आमदारांच्या अपात्रतेविषयी सुप्रीम कोर्टात याचिका प्रलंबित असताना राज्यात स्थापन झालेलं सरकार बेकायदेशीर असून या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होऊ देऊ नये, असं पत्र शिवसेनेकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देण्यात आलं आहे. या मुद्द्यावरून बंडखोर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी टीका करत हा रडीचा डाव असल्याचं म्हटलं होतं. त्यावर राऊत यांनी पलटवार करत म्हटलं आहे की, ‘हा रडीचा डाव आहे तर आमदारांच्या अपात्रतेविषयी तुम्ही कोर्टात का गेलात? कोर्टाने काय निर्णय दिला आहे हे राज्यपालांना कळवणं आमचं कर्तव्य आहे.’