सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्हा ऑरेंज झोनमध्ये होता तो आता ग्रीन झोनमध्ये समाविष्ट झाला आहे. त्यामुळे प्रशासनाला चांगलाच दिलासा मिळाला आहे. सध्या जिल्ह्यात फक्त एक रुग्ण करोना पॉझिटिव्ह आहे पण तोही मुंबईहून येथे आलेला आहे.

जिल्ह्यात घरी अलगीकरण करण्यात आलेले करोना सदृष्य लक्षणे असलेले २२४ रुग्ण आहेत तर संस्थात्मक अलगीकरण करण्यात आलेले असे १२० रुग्ण आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात २ हजार ७२७ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. प्रशासनाच्या दक्षतेमुळे सिंधुदुर्गने करोनाशी समर्थपणे मुकाबला केला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक घरातील किमान दहा व्यक्ती मुंबईत आहेत. तसेच हा जिल्हा गोवा सीमेवर आहे म्हणूनच बाहेरून येणाऱ्यांना रोखण्याचे कठीण आव्हान प्रशासनाने पेलले आहे. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम यांच्या नेतृत्वाखाली यंत्रणा कार्यरत असून कडेकोट बंदोबस्त राबवण्यात येत आहे. पालकमंत्री उदय सामंत जिल्ह्यातच असून प्रशासकीय यंत्रणेवर ते नजर ठेवून आहेत. पोलिसांनी अनावश्यक बाहेर फिरणाऱ्यांविरोधात मोहीम राबवायला सुरुवात केली असून कणकवलीत ४० वाहने जप्त केली आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत करोनाचे फक्त दोनच रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी एका रुग्णाच्या सर्व चाचण्या यापूर्वीच निगेटिव आल्या आहेत तर दुसरा रुग्ण मुंबईतून जिल्ह्यात आला आहे. सध्या या रुग्णावर उपचार सुरु आहेत.

…तर चाकरमान्यांना गावी आणणार!

एप्रिल आणि मे महिना हा चाकरमानी गावी येण्याचा महिना आहे. मात्र यावर्षी त्यांच्यावर बंधने आली आहेत. शासनाचा निर्णय झाल्यानंतर चाकरमान्यांना गावी आणण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र करोना सारख्या विषयावर तरी विरोधकांनी राजकारण करू नये असेही आवाहन त्यांनी केले.

…म्हणून जिल्हा ग्रीन झोनमध्ये

केंद्र सरकारने दिलेल्या यादीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा ग्रीन झोन मध्ये दाखवण्यात आला आहे. तथापि, सध्या जिल्ह्यामध्ये एक रुग्ण पॉझिटिव्ह असल्यामुळे याविषयी केंद्र स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. सध्या केंद्राने गेल्या आठवड्यातील अहवालाच्या आधारावर झोन तयार केले आहेत. त्यामुळे नुकताच सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडलेल्या रुग्णाची नोंद झाली नसल्यामुळे सिंधुदुर्गला ग्रीन झोनमध्ये स्थान मिळाले. केंद्र शासनाच्या नियमानुसार सलग १९ दिवस ज्या ज्या क्षेत्रामध्ये एकही करोना रुग्ण आढळलेला नाही अशी क्षेत्रं ग्रीन झोनमध्ये टाकण्यात आली आहे. दरम्यान, तीन मे नंतर राज्य शासन व केंद्र सरकार यांच्याकडून येणाऱ्या सूचनांनुसार पुढील निर्णय घेतले जातील, असे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सांगितले.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here