जळगाव :पब्जी गेम खेळण्यासाठी मोबाईलचा रिचार्ज करुन न दिल्याच्या रागातून घरातून निघून गेलेल्या तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बोदवड शहरात घडली आहे. रविवारपासून बेपत्ता असलेल्या या तरुणाचा दोन दिवसानंतर मंगळवारी विहिरीत मृतदेह आढळून आल्यानंतर आत्महत्येचा प्रकार समोर आला आहे. अजय सुरेश माळी (वय २०, रा. दत्त कॉलनी बोदवड) असं मृत तरुणाचं नाव आहे.

शहरातील दत्त कॉलनीत सुरेश सखाराम माळी (वय ५१) हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. काही दिवसांपूर्वी सुरेश माळी यांनी त्यांचा मुलगा अजय यास स्मार्टफोन घेऊन दिला होता. या मोबाईलमध्ये अजय याने पब्जी गेम डाऊनलोड केला होता. गेम खेळताना तीन दिवसातच रिचार्ज संपल्याने अजयने वडिलांना मोबाईल रिचार्ज करुन द्या, अशी मागणी केली. तसंच रिचार्च न केल्यास मी घरातून निघून जाईन असंही तो वडिलांना म्हणाला होता. मात्र वडिलांनी त्यास पब्जी खेळू देण्यास मनाई करत रिचार्ज करण्यास नकार दिला. या रागातून अजय हा १० जुलै रोजी घरातून निघून गेला व बेपत्ता झाला होता.

आदिवासी पित असलेलं पाणी पिण्यास नवनीत राणांचा नकार, कार्यकर्त्यांना म्हणाल्या तुम्हीच पिऊन दाखवा

सर्वत्र शोध घेतल्यानंतर अजय आढळून न आल्याने त्याचे वडील सुरेश माळी यांनी पोलिसांत तो हरवल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार बोदवडव पोलिसात नोंद करण्यात आली होती. दरम्यान दोन दिवसांपासून त्याचा शोध सुरू असतानाच मंगळवारी बोदवड शहरातील रूप नगरामधील प्रभाग क्रमांक ३ मध्ये खाटीक समाज मंदिराजवळील विहिरीत अजयचा मृतदेह आढळून आला. ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्यास तपासून मयत घोषित केले.

पावसात नदी ओलांडताना घात झाला; महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू

दरम्यान, या प्रकरणी सुरेश माळी यांच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस अधिकारी युनूस तडवी करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here