नंदुरबार : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा धुमाकूळ सुरू असून काही ठिकाणी जीवितहानीच्या घटना घडत आहेत. नंदुरबारमधील नवापूर तालुक्यातील खांडबारा परिसरातही एका महिलेचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मृत महिलेची अद्याप ओळख पटलेली नसून सदर महिला नदी ओलांडून पलीकडेअसणाऱ्या गावात जाण्याचा प्रयत्न करत असताना तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
सदर महिलेची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. या महिलेच्या गळ्यात मंगळसूत्र व हातावर गोंदलेले असून ओळख पटल्यास विसरवाडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस अधिकारी नितीन पाटील यांनी केलं आहे.
दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून नवापूर तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. जिल्ह्यात पावसाचा सर्वाधिक फटका नवापूर तालुक्याला बसला असल्याचे चित्र आहे. जवळपास २५ घरांची पडझड झाली आहे, तर नदीकाठच्या २०० हुन अधिक कुटुंबांचे स्थलांतरही झाले आहे. तालुक्यातील सर्वच नदी-नाल्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.