मुंबई : ड्रग्ज प्रकरणामध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं अटक केल्यानंतर आर्यन खानचा पासपोर्ट जप्त केला होता. परंतु याप्रकरणी आर्यनला क्लिन चिट मिळाली आहे. त्यामुळे आर्यननं विशेष एनडीपीएस न्यायालयात पासपोर्ट परत मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यावर आज सुनावणी झाली असता न्यायालयानं आर्यनचा पासपोर्ट परत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

शाहरुख खानच्या लेकाला आर्यनला गेल्यावर्षी २ ऑक्टोबर २०२१ रोजी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रुझवर रेव्ह पार्टीतून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)नं अटक केली होती. त्यानंतर तो २८ दिवस तुरुंगात होता. अनेक महिने हा खटला न्यायालयात सुरू होता. अखेर एनसीबीनं मे महिन्यामध्ये आर्यनला याप्रकरणी क्लिन चिट दिली होती. क्लिनचिट मिळाल्यानंतर आर्यननं विशेष एनडीपीएस न्यायालयात त्याचा जप्त केलेला पासपोर्ट परत मिळावा तसंच जामिनाबाबतचा बाँड रद्द करण्याची याचिका केली होती. आर्यनच्या याचिकेवर आज सुनावणी झाली.

आर्यन ड्रग्ज प्रकरणावर पहिल्यांदाच बोलणार खान कुटुंबातील व्यक्ती, वाचा कुठे आणि कोण

आर्यनं ही याचिका केल्यानंतर न्यायालयानं एनसीबीला त्यांची भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलं होतं. या प्रकरणाच्या सुनावणी विशेष न्यायाधीश वी. वी. पाटील यांच्यासमोर झाली. यावेळी एनसीबीनं आर्यनला पासपोर्ट देण्याबाबत विरोध दर्शवला नाही. स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर अद्वैत सेठना यांनी एनसीबीची बाजू मांडली. त्यांनी न्यायालयात एनसीबीतर्फे दोन पानांमध्ये उत्तर सादर केलं. त्यात आर्यनचा पासपोर्ट परत करण्याबाबत आणि जामिनाचा बाँड रद्द करण्याबाबत एनसीबीला काहीच हरकत नसल्याचं नमूद केलं होतं. आर्यनची बाजू अमित देसाई यांनी मांडली.

आर्यनला पासपोर्ट केव्हा मिळणार

अद्वैत सेठना यांनी सांगितलं की, आर्यनचा पासपोर्ट कोर्टाच्या कस्टडीमध्ये आहे. त्यामुळे कोर्टानं ऑर्डर दिल्यानंतर त्याला पासपोर्ट परत दिला जाईल.

दरम्यान, आर्यन सध्या वेब सीरिजचं स्क्रिप्ट लिहिण्यात व्यग्र आहे. त्याची ही वेब सीरिज एका ओटीटीवर रिलीज होणार आहे. त्याचप्रमाणे शाहरुख खानच्या आगामी पठाण सिनेमासाठी देखील आर्यन काम करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here