45 hand guns seized from 2 passengers at igi airport: इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन भारतीय नागरिकांकडे तब्बल ४५ हँडगन सापडल्या. दिल्ली कस्टम विभागानं हँडगनचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. दोन्ही नागरिक भारतीय असून ते तुर्कस्तानहून आल्याची माहिती समोर आली आहे.

हायलाइट्स:
- भारतीय दाम्पत्याला दिल्ली विमानतळावर अटक
- दोघांच्या बॅगमध्ये सापडल्या ४५ हँडगन
- दाम्पत्याची कसून चौकशी सुरू
कस्टम अधिकाऱ्यांना दोन भारतीयांच्या बॅगमध्ये ४५ हँडगन सापडल्या. जगजीत सिंग आणि जसविंदर कौर अशी दोघांची नावं असून ते एकमेकांचे पती पत्नी आहेत. या दाम्पत्याची अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली. त्यातून धक्कादायक माहिती उघडकीस आली. आम्ही अशाप्रकारे हँडगनचा साठा पहिल्यांदाच आणलेला नाही. याआधीही आम्ही जवळपास २५ हँडगन आणल्या आहेत, असं दाम्पत्यानं अधिकाऱ्यांना सांगितलं.
आज जप्त करण्यात आलेल्या हँडगन्सची किंमत जवळपास १२.५० लाख रुपये इतकं आहे. या हँडगन खऱ्या आहेत की खोट्या ते फॉरेन्सिक तपासातून समजेल. मात्र प्राथमिक तपासातील माहितीनुसार त्या खऱ्या आहेत. तुर्कस्तानातून भारतात हँडगनची तस्करी होत असल्याचं यामुळे स्पष्ट झालं आहे. जगजीत सिंगला हँडगननी भरलेली बॅग त्याच्या भावानं दिली. तिथून जगजीतसोबत जसविंदरदेखील दिल्लीला आली.
जगजीत सिंग आणि जसविंदर कौर हे दोघे हरयाणाच्या गुरुग्रामचे रहिवासी आहेत. आरोपी दाम्पत्य व्हिएतनामच्या हो ची मिन्ह विमानतळावरून दिल्लीला पोहोचले. कस्टमच्या अधिकाऱ्यांनी त्यांना इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या गेटवर रोखलं. दोघांकडे सापडलेल्या हँडगन खऱ्या असल्याचं एनएसजीनं सांगितलं. दहशतवादी हल्ले आणि गुन्हेगारांचं सिंडिकेट अशा दोन बाजूंनी सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : 45 hand guns seized from 2 passengers at igi airport delhi police engaged in investigation
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network