शहरात गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. ११ जुलैपर्यंत हा पवासाचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर हवामान विभागाने आता १५ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे, शहरात खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी आवश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, असं आवाहन केले असतानाच आता खासगी कंपन्या तसेच आयटी कंपन्यांनाही महापालिकेने वर्क फ्रॉम होमसाठी कर्मचाऱ्यांना दोन दिवस प्रोत्साहन द्यावे, अशी विनंती केली आहे.
शहरात पावसामुळे वाहतूककोंडी होत आहेच शिवाय मुठा नदीतही मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. याशिवाय, पावसामुळे शहरात मोठया प्रमाणात झाड कोसळण्याच्या घटनाही घडत आहेत. अशा स्थितीत संभाव्य धोके टाळण्यासाठी महापालिकेकडून हे आवाहन करण्यात आलं आहे.