मी शिंदे गटाचा प्रवक्ता आहे. ज्या दिवशी खासदार सांगतील तुम्ही बोला, तेव्हा मी बोलेन. माझ्या माहितीनुसार हे गाडं मानपानावरुन अडलं आहे. आधी फोन कोणी करायचा यावरुन मातोश्री आणि भाजप श्रेष्ठी यांच्यात बोलणी अडली आहे पर्यायाने युती अडली आहे. गुवाहाटीवरुन मी जाहीर केलेलं की आज शेवटचा दिवस आहे, महाविकास आघाडी तोडा, आम्ही ५० आमदार महाराष्ट्रात येऊ, पण आघाडी तोडली नाही, आज ती अनायसे तुटली आहे, असं दीपक केसरकर म्हणाले.

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला असतानाच शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. पहिला फोन कुणी करायचा? यावर भाजप-शिवसेनेची युती अडली आहे. मानपानावर फक्त सेना-भाजपची युती अडली आहे. मातोश्री आणि भाजपश्रेष्ठी यांच्यात बोलणी अडलेली आहे, असा मोठा गौप्यस्फोट केसरकरांनी केला आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.