Maharashtra Rain : राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं काही ठिकाणी पूरससृश्य स्थिती निर्माण झाली आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. यामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील केलं आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघर, कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सध्या पावसानं धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, वैतरणा नदीत बहाडोली इथे 13 कामगार अडकले आहेत. सध्या जिल्हा प्रशासनाचे बचावकार्य सुरु आहे. या पावसाचा शेती पिकांना देकील मोठा फटका बसला आहे.

मुंबई-वडोदरा महामार्गाच्या फ्लाय ओव्हर ब्रीजच काम सुरु आहे. हे काम सुरु असताना अचानक पूर आल्यानं वैतरणा नदीत बहाडोली येथे 13 कामगार अडकले आहेत. हे सर्व जण स्किल्ड वर्कर असल्याचे सांगण्यात येत आहे. NDRF च्या टीम ला पाचारण करण्यात आलं असल्याची माहिती तहसीलदार सुनील शिंदे यांनी दिली आहे. त्यांना बाहेर काढण्याचे जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहे.  

आज राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

दरम्यान, राज्यात आज  मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, कोकण, पुणे, नाशिकच्या काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणासह राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पालघर, पुणे शहर, गडचिरोली, या ठिकाणी पुढचे दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

शाळांना सुट्टी

ठाणे, पालघर, नवी मुंबई, पनवेल महापालिका क्षेत्रातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तर मुंबई विद्यापीठाच्या उद्या होणाऱ्या परीक्षा सुद्धा रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र, अजूनही मुंबईच्या शाळांबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही, परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाणार आहे.

पालघर, नाशिक, पुणे या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर नंदूरबार, धुळे, जळगाव. अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, बुलढाणा, अकोला, वाशिम, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. येत्या दोन दिवसामध्ये पावसाचा हा जोर कायम राहण्याची शक्यता असून अनेक ठिकाणच्या शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. 

राज्यभर पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांच्या आणि धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here