राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेत सध्या प्रत्येक जिल्ह्यात अंतर्गत कलह सुरू आहे. बहुतांश आमदार एकनाथ शिंदे यांच्या समवेत गेलेले आहेत. आपण शिवसेनेसोबतच कायम असून शेवटच्या श्वासापर्यंत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याची भूमिका खासदार संजय जाधव व आमदार राहुल पाटील यांनी यापूर्वी जाहीर केली आहे. राज्यात सत्तांतराचा खेळ चाललेला असताना खासदार संजय जाधव हे दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे आषाढी वारीत होते.
आमदारांच्या फाटाफुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार स्थापन झालं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शिवसेनेच्या खासदारांचीही बैठक घेतली. प्रकृती ठीक नसल्याने बैठकीच्या दिवशी खासदार संजय जाधव हे मुंबईत उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र काल शिवसेनेच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांसह खासदार जाधव मुंबईकडे रवाना झाले आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
दरम्यान, परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून तो कायम आपल्या पाठीशी भक्कमपणे राहील, असा विश्वास यावेळी खासदार जाधव यांनी उद्धव ठाकरेंना दिला. खासदार जाधव यांच्यासह शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम, सुरेश ढगे, पंढरीनाथ धोंडगे यांच्यासह सर्व तालुकाप्रमुख व महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.