अमित ठाकरे सध्या आमदार किंवा विधान परिषद सदस्य नाहीत. मात्र, शिवसेनेला शह देण्यासाठी ठाकरे घराण्यातील व्यक्तीला मंत्रिपद देण्याची चाल भाजपकडून खेळण्यात आल्याची माहिती आहे. यामागे शिवसेनेभोवती असणारे ठाकरे घराण्याचे वलय कमी करण्याचा प्रयत्न आहे. आमच्यासोबत एकनाथ शिंदे यांच्यासारखा सामान्य शिवसैनिकही आहे आणि ठाकरे ब्रँडही आहे, असे दाखवण्याचा भाजपचा प्रयत्न असू शकतो. त्यामुळे अमित ठाकरे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याविषयी भाजपने मनसेला ऑफर दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, राज ठाकरे ही ऑफर स्वीकारणार की नाही, हे आता पाहावे लागेल.
यापूर्वी शिवसेनेने आदित्य ठाकरे यांना पर्यावरणमंत्री आणि पर्यटन खात्याचा कारभार दिला होता. गेल्या अडीच वर्षांत आदित्य ठाकरे यांनी आपल्या कामाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यांच्या पर्यावरण खात्यातील कामाचे अनेकांनी कौतुकही केले होते. मंत्री म्हणून त्यांचा वावर अगदी सहज झाला होता, त्यांच्यात बराच आत्मविश्वासही आला होता. त्यामुळे आदित्य ठाकरे हे शिवसेनेतील तरुण पिढीसाठी आकर्षण केंद्र ठरताना दिसत होते.
राज ठाकरे यांचे पूत्र असल्यामुळे अमित ठाकरे यांच्याभोवतीही एक वेगळे वलय आहे. त्यामुळे अमित ठाकरे यांना मंत्रिपद दिल्यास तरुण मतदारांवर प्रभाव पडू शकतो, असा भाजपचा अंदाज आहे. अमित ठाकरे सध्या मनसे विद्यार्थी सेनेच्या प्रमुखपदी आहेत. मात्र, आता ते थेट मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळू शकतात का, हे पाहावे लागेल.
राज ठाकरेंनी प्रस्ताव नाकारला?
राजकीय वर्तुळात अमित ठाकरे यांच्या मंत्रिपदाची चर्चा सुरु असली तरी मनसेच्या नेत्यांनी आपल्याला अशी कोणतीही माहिती नसल्याचे म्हटले आहे. भाजप नेत्यांनीही याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, राज ठाकरेंनी ही ऑफर धुडकावून लावल्याचे वृत्त मनसेकडून येत आहे. मात्र, याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.