मुंबई : विधानसभेतील ५५ पैकी तब्बल ४० आमदारांच्या बंडखोरीमुळे हैराण झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेच्या तब्बल १५ खासदारांनी बुधवारी रात्री उशिरा शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचे समजते.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील आमदारांसह बंड करत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडलं. तसंच वेगवेगळ्या महानगरपालिकांतील नगरसेवक आणि स्थानिक नेत्यांना आपल्याकडे खेचत शिंदे यांनी ठाकरेंना जोरदार आव्हान दिलं आहे. त्यातच आता खासदारांनाही आपल्या गटात खेचण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. बुधवारी रात्री शिवसेनेचे १८ पैकी तीन खासदार वगळता इतर तब्बल १५ खासदार शिंदे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीसाठी उपस्थित असल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे. या खासदारांनीही एकनाथ शिंदे यांना आपला पाठिंबा दिल्यास उद्धव ठाकरे यांची आगामी राजकीय वाटचाल आणखी खडतर होणार आहे.

Amit Thackeray: ठाकरे घराण्याचा ‘राजपुत्र’ शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळात? भाजपने मनसेला ऑफर दिल्याची चर्चा

एकनाथ शिंदेंचं बंड आणि ठाकरेंच्या राजकीय अस्तित्वाला हादरे

शिवसेनेते ‘मातोश्री’चा अर्थात ठाकरे कुटुंबाचा आदेश अंतिम मानला जातो. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संघटनेवर घट्ट पकड असल्याचं बोललं जात होतं. मात्र पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि थेट ठाकरे कुटुंबालाच आव्हान दिलं. शिंदे यांनी शिवसेनेचे दोन तृतीयांशपेक्षा अधिक आमदार आपल्या गटात आणत ताकद दाखवून दिली. तसंच आमची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचं शिंदे गटाकडून सांगितलं जात आहे. आमदारांनंतर आता खासदारही शिंदे गटात सामील झाल्यास उद्धव ठाकरे यांच्या राजकीय अस्तित्वाला मोठा हादरा बसू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.

गुजरातमध्ये पावसाचा कहर! अतिवृष्टीमुळं २४ तासांत १४ जणांनी गमावला जीव

शिंदे गटाची एनडीएच्या बैठकीला उपस्थिती

उद्धव ठाकरे हे मागील अडीच वर्षांपासून भाजपविरोधात टीकेचा सूर आळवत असताना बंडखोर शिंदे गटाने मात्र भाजपच्याच मदतीने राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर आता राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतही या गटाचे नेते भाजपसोबत असल्याचं दिसत आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजप-एनडीएच्या सर्व खासदार व आमदारांना अचूक मतदान करता यावे म्हणून भाजप मुख्यालयात भाजप-एनडीएच्या घटक पक्षांच्या प्रतिनिधींची बुधवारी बैठक झाली. या बैठकीला शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रतिनिधी म्हणून आमदार दीपक केसरकर हे उपस्थित होते. भाजप-एनडीएच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना उद्धव ठाकरे यांनी आपला पाठिंबा जाहीर केला असला तरी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून मात्र अद्याप उद्धव ठाकरे यांचे जाहीररित्या आभार व्यक्त करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे शिंदे गटाला सोबत घेऊन उद्धव ठाकरे यांना बाजूला पाडण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे का, अशीही चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here