मुंबई : राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या आज मुंबई दौऱ्यावर आहेत. मुर्मू या भाजप खासदार आणि शिंदे गटातील नेत्यांची भेट घेणार आहेत. शिवसेनेकडून पाठिंबा जाहीर करण्यात आल्यानंतरही द्रौपदी मुर्मू यांच्या बैठकीचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण पाठवण्यात आलं नव्हतं. मात्र आता मुर्मू-ठाकरे भेट घडवून आणण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे मध्यस्थी करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेना खासदारांसोबत झालेल्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी आपण द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतिपदासाठी पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं. मात्र तरीही ठाकरे आणि भाजप नेत्यांमधील दरी कमी झाली नव्हती. तसंच मुर्मू या मुंबई दौऱ्यावर असल्या तरीही त्या उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’वर जाणार नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे भाजपकडून उद्धव यांना एकाकी पाडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत का, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र ठाकरे कुटुंब आणि भाजपमध्ये निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी आता विनोद तावडे यांच्या माध्यमातून प्रयत्न होत असल्याचं दिसत आहे.

Raj Thackeray: अमित ठाकरेंना भाजपकडून मंत्रिपदाच्या ऑफरची चर्चा, राज ठाकरे म्हणाले…

विनोद तावडे हे गेल्या काही वर्षांपासून राज्याच्या राजकारणात सक्रिय नाहीत. मात्र पक्षाच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी मिळाल्यापासून राष्ट्रीय राजकारणात त्यांचा वावर आहे. तसंच उद्धव ठाकरे यांच्याशीही तावडे यांचे चांगले संबंध आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेतृत्वाकडून विनोद तावडे यांच्यावर उद्धव ठाकरे आणि द्रौपदी मुर्मू यांची भेट घडवून आणण्याची जबाबदारी देण्यात आल्याचे समजते. मात्र ही भेट मातोश्रीवर होणार नसून बाहेर एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये होईल, अशी माहिती आहे. या भेटीबाबत अद्याप अधिकृतरित्या दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून माहिती देण्यात आलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here