ajit pawar, अडीच वर्षांत मी कधी उद्धवजींचा माईक नाही खेचला; अजित पवारांचा फडणवीसांना टोला – ncp leader ajit pawar taunt deputy cm devendra fadnavis after he snatches cm eknath shinde mic
पुणे: पत्रकार परिषद सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोरील माईक स्वत:कडे खेचणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी टोला लगावला आहे. अडीच वर्षात आम्ही कधी माईक कधी खेचला नाही. मी कधीच उद्धवजींसमोरचा माईक खेचून स्वत:कडे घेतला नाही. ही तर सुरुवात आहे. आत्तापासून ओढाओढी असेल तर महाराष्ट्राने हे पाहावं, अशा शब्दांत अजित पवारांनी फडणवीसांना चिमटा काढला. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
मी अर्थमंत्री असताना गॅसवरील कर १३.५ टक्क्यांवरून ३ टक्क्यांवर आणण्यात आला. त्यामुळे सरकारी तिजोरीवर १ हजार कोटींचा भार पडला. आता सत्तेत असलेले त्यावेळी विरोधात होते. सरकारनं पेट्रोल, डिझेलवरील करात ५० टक्क्यांनी कपात करावी, अशी त्यांची मागणी होती. आता हीच मंडळी सत्तेत आहेत. मात्र त्यांनी इंधनावरील कर ५० टक्क्यांनी कमी केलेला नाही, याकडे पवारांनी लक्ष वेधलं.
इंधनावर राज्य सरकारनं लावलेला कर ५० टक्क्यांनी कमी करा अशी मागणी विरोधात असताना भाजपचे नेते करत होते. तसा निर्णय आताच्या राज्य सरकारनं घेतला असता तर डिझेल ११ रुपयांनी आणि पेट्रोल १७-१८ रुपयांनी स्वस्त झालं असतं. मात्र त्यांनी तसा निर्णय घेतलेला नाही. विरोधात असताना मागण्या करायच्या आणि सत्तेत आल्यावर मात्र वेगळंच करायचं, हेच यातून दिसून येत असल्याचं पवार म्हणाले. सरकार बदलल्यानंतर आम्ही काहीतरी करत आहोत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न शिंदे आणि फडणवीसांकडून सुरू असल्याची टीका त्यांनी केली. द्रौपदी मुर्मू यांचे मुंबईत उत्साहात स्वागत; दौरा यशस्वी करण्यासाठी भाजपचे विशेष प्रयत्न
शिंदे आणि फडणवीस हे दोन जण महाराष्ट्राचे मालक झाले आहेत. सगळा भार या दोघांच्याच खांद्यावर आहेत. सरकारकडे १६५ आमदारांचं पाठबळ आहे. पण घोडं कुठे पेंड खात आहे? मंत्रिमंडळाचा विस्तार करायला सरकार का घाबरतंय? असे सवाल पवारांनी उपस्थित केले. सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांत पूरपरिस्थिती आहे. मंत्रिमंडळ असतं, पालकमंत्री असते तर पूरग्रस्तांना सक्षमपणे मदत करता आली असती, असं पवार म्हणाले.