Narhar Kurundkar : साहित्यिक आणि महाराष्ट्रातील विचारवंत नरहर कुरुंदकर (Narhar Kurundkar) यांची आज जयंती आहे. एक प्रसिद्ध लेखक, मराठी भाषा आणि साहित्याचे गाढे अभ्यासक म्हणून नरहरी कुरुंदकर यांना ओळखलं जातं. ते एक समाजचिंतक आणि प्रभावी वक्ते होते. तर्कसंगत विचार आणि प्रमाणबद्ध मांडणीच्या जोरावर ते आपला विषय लोकांना पटवून देत होते. संगीत, साहित्य, कला, धर्म, इतिहास आणि तत्त्वज्ञान यांचा परस्पर संबंध समजून घेऊन त्यावर ते बोलत होते. तत्कालीन प्रश्नांची उत्तरंच नाही तर त्या समस्येचं मूळ काय आहे याबद्दल ते कुरुंदकर थेट बोलत होते.

कुरुंदकर यांचा जन्म 15 जुलै 1932 रोजी महाराष्ट्रातील मराठवाडा भागातील हिंगोली जिल्ह्यातील नांदापूर गावात झाला होता. हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा हे त्यांचे मूळ गाव होते. 1932 ते 1982 असे जेमतेम 50 वर्षांचेचे आयुष्य नरहर कुरुंदकर यांना लाभले होते. परंतू येवढ्या काळात त्यांच्या हातून वैचारीक लिखाणाचे मोठे काम झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण वसमतला झाल्यानंतर ते त्यांच्या मामाच्या घरी हैदराबादला गेले आणि तिथं त्यांनी पुढचं शिक्षण घेतलं. लहान वयातच त्यांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामात सहबाग घेतला होता. या लढ्याच्या निमित्ताने त्यांना अनेक मोठ्या लोकांना जवळून पाहता आलं. वयाच्या 11 व्या वर्षी त्यांनी कविता केली आणि एका नियतकालिकाला पाठवली. त्यांना वाटलं पुढच्या अंकात ती छापून येईल. पण आली नाही. तेव्हापासून ते नियमित लिहून नियतकालिकांना आपले लेख साहित्य पाठवू लागले. त्यांचा पहिला लेख त्यांच्याच मामांनी छापला होता. पहिला लेख छापून येण्यासाठी त्यांना 10 ते11 वर्षं लागली. त्यानंतर त्यांना मागे वळून पाहावं लागलं नाही.


आणीबाणीच्या काळात त्यांनी लोकशाहीचं महत्त्व पटवून दिलं

नरहर कुरुंदकरांनी MA चं शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1963 मध्ये ते पीपल्स कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. ते विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. प्राध्यापक म्हणून रुजू झाल्यानंतर ते ठिकठिकाणी व्याख्यान देऊन लोकांना वेगवेगळे विषय समजावून सांगू लागले. कुरुंदकर राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते होते. या माध्यमातून त्यांनी जागोजागी तरुणांना प्रेरणा देण्याचं काम केलं. आणीबाणीनंतरच्या महाराष्ट्रात ज्या साहित्यिक आणि विचारवंतांनी महाराष्ट्राचं वैचारिक नेतृत्व केलं, त्यामध्ये कुरुंदकरांचं नाव आवर्जून घेतलं जातं. त्यांनी लिहिलेले उतारे, निबंध, लेख हे सातत्याने चर्चेचा विषय ठरले. आणीबाणीच्या काळात त्यांनी इसापनीती हा विषय घेऊन व्याख्यानं दिली. लोकांना लोकशाहीचं महत्त्व या गोष्टींच्या आधारे पटवून देऊ लागले. ते आणीबाणीविरोधी होते पण त्यांना अटक झाली नव्हती

नरहरी कुरुंदकर यांचे प्रकाशित झालेले साहित्य

नरहरी कुरुंदकरांनी अनेक पुस्तके लिहली. तसेच व्यक्तिचित्रेही लिहली. त्याचबरोबर कुरुंदकरांनी अनेक पुस्तकांना प्रदीर्घ प्रस्तावना देखील लिहिल्या आहेत. त्‍यांनी लिहिलेल्या प्रस्तावनांमधून आठ प्रस्तावनांची निवड करून ‘निवडक नरहर कुरुंदर’ हे संपादित पुस्तक आकाराला आलेले आहे. ‘देशमुख आणि कंपनी’ ने प्रकाशित केलेल्या या पुस्तकातील प्रस्तावनांची निवड विश्वास दांडेकर यांनी केलेली आहे. 

अभयारण्य   
आकलन 
जागर 
थेंब अत्तराचे  
धार आणि काठ  
निवडक कुरंदकर ग्रंथवेध भाग १, २ (संपादक विश्वास दांडेकर) 
निवडक पत्रे-नरहर कुरुंदकर (संपादक- जया दडकर)   
पं.नेहरू-एक मागोवा (सहलेखक- डॉ. एन.जी. राजूरकर)   
परिचय   
पायवाट   
भजन   
मनुस्मृती (इंग्रजी)   
मागोवा  
रुपवेध  
रंगशाळा   
शिवरात्र   
छत्रपती शिवाजी महाराज जीवन-रहस्य   
हैदराबाद : विमोचन आणि विसर्जन

यातील ‘ धार आणि काठ’ या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला आहे.

कुरंदकरांच्या प्रस्तावना लाभलेली पुस्तके

अमेरिकन निग्रो साहित्य आणि संस्कृती (जनार्दन वाघमारे)
चक्रपाणी (रा.चिं. ढेरे)
चलो कलकत्ता (बिमल मित्र)
महाडचा मुक्तिसंग्राम (झुंबरलाल कांबळे-राम बिवलकर)
लोकायत (स.रा.गाडगीळ)
श्रीमान योगी (रणजित देसाई) : सत्तर पानी प्रस्तावना
संस्कृती (इरावती कर्वे)
हिमालयाची सावली (वसंत कानेटकर)

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाला नकार 

नरहर कुरुंदकरांनी प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालय, नांदेड‎ येथे शिक्षक म्हणून तर नांदेड एज्युकेशन सोसायटीचे पीपल्स कॉलेज, नांदेड येथे प्राचार्यपद भूषविले होते. विशेष बाब म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद दोनदा बिनविरोध त्यांच्याकडे येऊनही त्यांनी त्याला नम्रपणे नकार दिला होता.

नांदेडमध्ये नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान

कुरुंदकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नांदेड शहरात त्यांच्या नावाचे ‘नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान’ स्थापन झाले आहे. श्यामल पत्की या प्रतिष्ठानच्या अध्यक्ष आहेत. या प्रतिष्ठानने 2010 साली, नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या आणि काही विद्यार्थ्यांच्या मदतीने सोसायटीच्याच स्वामी रामानंद तीर्थ संशोधन केंद्रात नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन व संशोधन केंद्र सुरु केले आहे. या अभ्यास केंद्रातर्फे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या संशोधकांना त्यांच्या प्रकल्पासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. संशोधकासाठी येथे शैक्षणिक अर्हतेची अट नसल्याने अनेक नवे प्रकल्प मार्गी लागले आहेत. शिष्यवृत्ती मिळाल्यापासून दोन वर्षात प्रकल्प सादर करणे एवढीच अट आहे. 

नरहर कुरुंदकर त्यांच्या करिअरच्या सर्वोच्च शिखरावर असताना 10 फेब्रुवारी 1982 ला त्यांना हार्ट-अॅटॅक आला. त्यामध्येच त्यांचे निधन झाले. ऐन पन्नाशीत कुरुंदकर गेले याचा धक्का मराठवाड्यालाच नाही तर पूर्ण राज्याला बसला. नांदेड येथे त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी असंख्य लोक जमा झाले होते.

(सदर माहिती विकिपीडिया मुक्त ज्ञानकोशमधून घेतली आहे)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here