सोनपेठ तालुक्यातील गौडगाव येथील अनिता वाघमारे (वय ४०) वर्षे आणि त्यांची मुलगी नेहा वाघमारे (वय १६) वर्षे यांनी आज शुक्रवारी सकाळी घरी केलेली टेकुळ्याची भाजी खाल्ली त्यानंतर थोड्यावेळाने त्यांना मळमळ आणि उलट्या झाल्या. यासोबतच जुलाब झाला हा प्रकार त्यांनी नातेवाईकांना सांगितल्यानंतर त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं.
रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली असता त्यांना टेकुळ्याची भाजी खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला. यानंतर गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. हेमंत मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू केले. उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या त्यांच्यावर गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत. त्या पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात येणार असल्याचं देखील रुग्णालय प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.
परभणीत घडला होता प्रकार
परभणी शहरांमध्ये पार पडलेल्या एका लग्नात जवळपास १०० ते १५० वराडांना जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार या अगोदर परभणी शहरामध्ये घडला होता. त्यांच्यावर परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करून प्रकृती ठीक झाल्यानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती. त्यानंतर आता सोनपेठ तालुक्यातील गौडगाव येथे जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे.