मुंबई :एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माईक खेचल्याचा प्रकार घडला होता. त्यावरुन विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र आता माईक ओढून घेणाऱ्या खुद्द फडणवीसांनीच याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. पत्रकाराने तो प्रश्न माझ्यासाठी असल्याचं सांगितल्यामुळे माईक खेचला, असं कारण देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तर कालच्या पत्रकार परिषदेत खिशातून पेन काढून चिठ्ठी लिहित शिंदेंकडे सरकवलेल्या कागदावरुनही फडणवीसांनी सवाल विचारला आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

पत्रकाराने प्रश्न विचारल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर देत होते, त्यावेळी पत्रकार म्हणाला, की तुम्हाला नाही हा प्रश्न उपमुख्यमंत्र्यांना आहे. म्हणून मी तो माईक घेतला, परंतु ते (पत्रकाराचा प्रश्न) म्यूट करुन दाखवलं गेलं. आता, माझ्या मुख्यमंत्र्याला मी एखादी चिठ्ठी लिहिली, तर त्यात गैर काय?
बातम्या कमी पडल्याने अशा चर्चा रंगतात. अशाच प्रकारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना मंत्रिपद देण्याची अफवा आली, असा टोलाही फडणवीसांनी लगावला.

कुठल्याही सरकारमध्ये सुपर सीएम नसतो, एकच सीएम असतो, एकच नेता असतो, एकच प्रमुख असतो. आमच्या सरकारमध्ये एकच सीएम आहे – ते म्हणजे एकनाथ शिंदे. ते आम्हा सगळ्यांचे नेते आहेत, त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करतोय. पण काही लोकांना ते बघवत नाही, सकाळी नऊ वाजता बोलणारे बोलतात, मग अकरा वाजता बोलणारा त्याचा एको देतात, मग दुपारी बोलणारेही टीका करतात, असं फडणवीस म्हणाले.

‘परळी’ला विचारल्याशिवाय राज्यात मोठी राजकीय घडामोड होणार नाही : धनंजय मुंडे
माईक कशावरुन खेचला?

हिंगोलीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यावरुन पत्रकाराने प्रश्न विचारला होता. बांगर कुठून आले, या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री काहीसे गोंधळलेले दिसले. “अरे शिवसेनेतून आले ना” असं शिंदे बोलत होते. त्याच वेळी फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांच्या समोर ठेवलेला माईक उचलून आपल्याकडे घेतला आणि “ओरिजिनल शिवसेनेत ते आलेत आता” असं उत्तर दिलं.

अजित पवारांचंही टीकास्त्र

सरकार येत असतं जात असतं. कोणीही ताम्रपट घेऊन आलं नाही. हे सरकार देखील किती दिवस टिकणार आहे माहित नाही. आत्ताच यांची माईक ओढाओढी सुरू झाली आहे. दोघंच जण सरकार चालवत असून यांचं घोडं अडलं कुठं कळत नाही असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे अगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणूकीच्या प्रचार सभेत बोलताना अजित पवारांनी हे वक्तव्य केलं आहे.

हेही वाचा : आधी माईक, आता चिठ्ठी, हा इगो जपण्याचा प्रयत्न, खडसे फडणवीसांवर पुन्हा बरसले

एकनाथ खडसेंचाही निशाणा

एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या हातातून माईक घेतला होता. आता पुन्हा फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत शिंदेंना चिठ्ठी लिहून दिली. या गोष्टी नेमक्या एकमेकांना मदत करण्यासाठी घडत आहेत, की एकमेकांचा इगो जपण्यासाठी, हे आता सांगता येणार नाही. शिंदे गट व भाजप युतीतील सरकार पूर्ण क्षमतेने चालेल, त्यावेळेस नेमकं सांगता येईल, की कोण कोणाच्या इशाऱ्यावरून चाललंय, असं एकनाथ खडसे म्हणाले.

हेही वाचा : आज माईक ओढलाय, उद्या पँट ओढतील, विनायक राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here