| Maharashtra Times | Updated: Jul 15, 2022, 9:04 PM

अक्षय आढाव, मुंबई : गेल्या तीन महिन्यांत घेतलेल्या सभा, ठाकरे सरकारवर ओढलेले आसूड, भाजपला अनुकूल घेतलेली भूमिका, ज्वलंत हिंदुत्वाचा मुद्दा तसेच शिवसेनेत पडलेली फूट, एकनाथ शिंदे यांचं बंड आणि मोठ्या नाट्यानंतर शिंदे-फडणवीसांचं विराजमान झालेलं सरकार… अशा सगळ्या पार्श्वभूमीवर बहुप्रतिक्षीत राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांची भेट पार पडली. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असं सगळ्यांनाच वाटत असताना पक्षनेतृत्वाच्या निर्णयानंतर फडणवीसांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी लागली. त्यानंतर फडणवीसांच्या जखमेवर राज ठाकरेंनी शब्दसुमनांनी फुंकर मारली. फडणवीसांसाठी खास पत्र लिहिलं. त्यानंतर आपण राज ठाकरेंची भेट घेणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. अखेर ‘शिवतीर्थावर’ दोघा नेत्यांची तब्बल पावणे दोन तास चर्चा झाली. ठाकरेंनी फडणवीसांचा खास पाहुणचार केला. पावणे दोन तासांच्या भेटीनंतर दोघांनी एकमेकांना बाय बाय केलं. या भेटीमागच्या महत्त्वाच्या ५ कारणांचा घेतलेला आढावा…

 

deputy cm devendra fadanvis meet mns chief raj thackeray at shivtirth mumbai
ठाकरे ब्रँडची साथ ते शिवसेनेला मात, राज-देवेंद्र भेटीमागील पाच अर्थ, शिवतीर्थ भेटीचं ‘राज’!

उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे

उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे

राज ठाकरेंच्या मदतीची परतफेड

ठाकरे सरकार अस्तित्वात असताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी या ना त्या मुद्द्यावरुन सरकारला कोंडीत पडकलं. कोरोना काळात सततच्या लॉकडाऊनवरुन राज यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले. तर कधी उद्धव ठाकरे मंत्रालयात येत नसल्याच्या कारणावरुन टीकेचे बाण सोडले. उद्धव ठाकरे यांचं आजारपणही राज ठाकरेंनी सोडलं नाही. नंतर मशिदीवरील भोंग्याविरोधात तीव्र आंदोलन छेडून सरकारला सळो की पळो करुन सोडलं. दरम्यान गेल्या तीन-साडे तीन महिन्यात राज ठाकरेंनी जवळपास चार सभा घेऊन शरद पवार आणि राज्य सरकारवर सातत्याने तोफ डागली. हे करत असताना राज ठाकरेंनी भाजपला अनुकूल भूमिका घेतल्याची चर्चा झाली. भाजपच्या वतीनेही वेळोवेळी राज ठाकरे कसे बरोबर आहेत, हे सांगितलं गेलं. याचदरम्यान राज मनसे-भाजप युतीच्याही चर्चा होत राहिल्या.

शिवसेनेला शह देण्याचा प्लॅन

राज ठाकरे यांना भेटून देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला शह दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. कारण गेले अनेक वर्षे राज-उद्धव यांच्यातली कटुता सर्वांनाच ज्ञात आहे. त्याउलट गेली २ वर्ष फडणवीस-राज यांच्यात मधुर संबंध निर्माण झालेत. आधीही ते होतेच, पण आता जाहीर व्यासपीठांवरुन कौतुकाचे गोडवे , कधी खास पत्र प्रपंच तर कधी भेटीगाठी यामुळे राज-फडणवीसांमधलं मैत्रीचं नातं अधिक घट्ट होताना दिसून येत आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्रिपदावरुन भाजप-शिवसेना यांच्यातला वाद विकोपाला गेला आणि त्याची परिणिती युती तुटण्यातपर्यंत गेली. मागील दोन वर्षात जेव्हा जेव्हा राज ठाकरे-फडणवीसांनी एकमेकांची बाजू घेतली तेव्हा सेना नेत्यांनी “ये रिश्ता क्या कहेलाता है?”, म्हणत चिमटे काढले, टीकेचे बाण सोडले, पण फडणवीसांनी राज ठाकरेंना जवळ करुन सेनेला शह द्यायची एकही संधी सोडली नाही.

उद्धव यांच्यानंतर ठाकरे ब्रँड स्वत:सोबत ठेवण्याची खेळी

महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात ठाकरे नावाला प्रचंड मोठं वलय आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी कोणतंही पद नसताना महाराष्ट्राच्या मनामनावर राज्य केलं. ते हयात असताना १९८५ साल वगळता अनेकदा कुरबुरी होऊनही २५ वर्ष युती अभेद्य राहिली. पण बाळासाहेबांच्या पश्चात २०१४ साली युती सेना भाजपची युती तुटली. पुन्हा काही महिन्यानंतर ते एकत्र आले खरे पण दररोज कुरबुरी झाल्याशिवाय पाच वर्षातला एक दिवस गेला नसेल… २०१९ नंतर तर राज्याचं राजकारण ३६० अंशात बदललं. फडणवीसांच्या सोबतीला ठाकरे राहिले नाहीत. तिकडे मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या सतत बदलत्या भूमिकांनी त्यांची अवस्था ‘इकडे आड तिकडे विहीर’ झाली होती. अखेर राज ठाकरेंनी आपल्या पक्षाचा झेंडा बदलून, ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करत आपल्या राजकारणाचीच दिशाच बदलली. मोदी-शहांना सडकून विरोध करणारे राज ठाकरे मवाळ झाले. कधी उत्तर प्रदेशातील योगींचं कौतुक करु लागले तर कधी समान नागरी कायद्याची मागणी करत भाजपची री ओढू लागले. या सगळ्यात राज ठाकरे भाजपच्या प्रचंड जवळ गेले. साहजिक युतीच्या चर्चा होऊ लागल्या. यात भाजप पर्यायाने फडणवीसांनी ठाकरे ब्रँड स्वत:सोबत ठेवण्याची मोठी खेळी खेळली.

मुंबई महापालिकेत शिवसेनेचं वर्चस्व मोडून काढण्याची रणनीती

काही महिन्यांवर मुंबई महापालिका निवडणूक आली आहे. आतापासून निवडणुकीची तयारी देखील सुरु झाली आहे. भाजपला आतापर्यंत जंग जंग पछाडूनही मुंबई पालिका निवडणुकीत शिवसेनेला ओव्हरटेक करणं जमलं नाहीये. यंदा एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे आणि राज ठाकरे यांच्या वाढत्या जवळीकीने तसेच मनसेबरोबरच्या संभाव्य युतीने शिवसेनेचं महापालिकेत असलेलं वर्चस्व मोडून काढण्याची भाजपला नामी संधी चालून आली आहे. गेली २५ वर्ष मुंबई महापालिकेवर सेनेचा भगवा डौलाने फडकतो आहे. यावेळी सेनेला आस्मान दाखवून मुंबई पालिका भाजपला काहीही करुन आपल्या ताब्यात घ्यायची आहे. देवेंद्र फडणवीस यांचा झंझावात, शिंदे-फडणवीसांच्या रुपाने सत्तेचा वापर, भाजपची प्रचार स्टाईल, राज ठाकरेंच्या भाषणाचा करिश्मा यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत सेनेचं गड खालसा करण्याचं भाजपचं स्वप्न आहे. त्याचं काय होतं, हे येणारा काळच सांगेल.

राज ठाकरेंनी केलेला ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार

उद्धव ठाकरे सत्तेत बसल्यानंतर त्यांचं हिंदुत्व मवाळ झाल्याचा आरोप सातत्याने विरोधकांनी केला. देवेंद्र फडणवीस तर वारंवार चिमटे काढत राहिले. यादरम्यान मिळालेली स्पेस भरुन काढण्यासाठी राज ठाकरेंनी टायमिंग साधलं, आपल्या झेंड्याचा रंग बदलला, अजेंडा बदलला आणि ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार केला. भाजप तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर गेली अनेक वर्ष राजकारण करत आहे. हिंदुत्वाचे आपणच कैवारी असल्याचं उघडपणे सांगत आहे. अशातच राज ठाकरेंनी केलेल्या हिंदुत्वाच्या पुरस्कारानंतर फडणवीस-राज एकमेकांच्या आणखीनच जवळ आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here